पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असा तीन विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे आता त्यांना हरविणारा माणूस मिळणे मुश्किल आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते होते. मोदींनी वाजपेयींचा भाषणाचा आणि पंडित नेहरुंचा निवडणुकीत मते आणण्याचा गुण घेतला. त्यामुळे आज मोदींच्या अश्वमेधाला रोखणारे कोणीही नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
देवगांवकर फाऊंडेशनतर्फे भाऊंबरोबर संवाद या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासोबत विशेष कार्यक्रमाचे आयोजन पीवायसी हिंदू जिमखाना येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ.संदीप बुटाला, फाऊंडेशनचे मंदार देवगांवकर, अमृता देवगांवकर, अमृत श्रोत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या अश्वमेध २०२४ या नव्या आणि ४ पुर्नमुद्रित पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमात झाले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
भाऊ तोरसेकर म्हणाले, सन २०२४ मध्ये निवडणूक होणार हे माहित असूनही जून २०२३ मध्ये इंडिया आघाडी करण्यात आली. मोदींना यश मिळणार हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, तरी देखील फोडाफोडी का होत आहे, असे अनेकजण विचारतात. त्यांनी इयत्ता १ली – २रीचे तरी शिक्षण घेतले आहे की नाही, हा मला प्रश्न पडतो. याचे नेमके उत्तर म्हणजे मोदी आणि शहांना केवळ निवडणूक जिंकायची आहे असे नाही, तर त्यांना त्यामध्ये टॉपर व्हायचे आहे.
ते पुढे म्हणाले, गांधी-गुजरात हे नाते मोदींनी गेल्या ११ वर्षात जगाला विसरायला लावले. आता मोदी-गुजरात हे आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळते. मोदींच्या आयुष्यात कष्ट, गरीबी हे वास्तव आहे. त्यांनी तळागाळात काम केले आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील माणसाचे दु:ख माहित आहे. याचा परिणाम म्हणजे तशा प्रकारच्या योजना जनसामान्यांसाठी आणल्या जात आहेत. जिंकण्याचा प्रचंड आत्मविश्वास असलेले हे व्यक्तिमत्व असल्याने मोदींना यावेळी प्रचाराला जायची देखील गरज नाही. त्यांचा अश्वमेध कोणीही रोखू शकणार नाही.
मंदार देवगांवकर म्हणाले, विविध ठिकाणी, अनेक कट्टयांवर राजकारणाची चर्चा होत असते. मात्र राजकारणातील घडामोडींची तर्कशुद्ध मांडणी करुन सामान्य नागरिकांचे शंकानिरसन व्हावे, याकरिता भाऊंबरोबर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजकारण व रणनितीवर प्रश्न निर्माण झाले की भाऊ तोरसेकर यांची प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर येते, त्या प्रतिक्रिया आपण ऐकतोच. मात्र, प्रत्यक्ष संवाद व्हावा, हा कार्यक्रमामागील उद्देश होता, असेही त्यांनी सांंगितले. डॉ.संदीप बुटाला यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.गार्गी कान्हेरे-कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.


