भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन (सीडीएमओ) क्षेत्रातील विविध डोस फॉर्म्सच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या आणि 24 वेगवेगळ्या औषध-निर्मिती प्रकारांमध्ये कार्यरत असलेल्या कोटेक हेल्थकेअर लिमिटेडने (स्रोत: एफ अॅंड एस अहवाल) सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 2,950 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्शू आणि 60 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा या ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’मध्ये समावेश आहे.
कंपनी कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन (सीडीएमओ) म्हणून काम करते. ती औषधांचे सूत्रीकरण विकसित करते, लोन लायसन्सिंग उपलब्ध करून देते आणि पेटंट संपलेली औषधे तयार करते. यात गुंतागुंतीची जनरिक औषधेही येतात. ही औषधे मॉडिफाइड-रिलीझ आणि सस्टेन्ड-रिलीझ या प्रगत औषध-वितरण पद्धतींनी तयार केली जातात. कंपनी संस्थात्मक ग्राहकांनाही आणि खासगी ग्राहकांनाही सेवा पुरवते.
इंजेक्टेबल्स, गोळ्या, कॅप्सूल्स, मलमे, डोळ्यांचे थेंब, अँप्युल्स, व्हायल्स, द्रवरूप व कोरडी सिरप्स आणि इन्फ्युशन्स अशा विविध डोस स्वरूपांमधील औषधांचा आणि सेवांचा कंपनीच्या उत्पादन संचात समावेश आहे.
आपल्या समकक्ष कंपन्यांच्या तुलनेत कोटेक ही सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. वित्तीय वर्ष 2023 ते 2025 या कालावधीत तिच्या महसुलात 52.72 चक्रवाढ दराने वार्षिक वाढ झाली आहे (स्रोत: एफ अॅंड एस अहवाल). या काळात कंपनीने उच्च मूल्याच्या ग्राहकांवर, विशेषतः उच्च मूल्याची उत्पादने घेणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी धोरणात्मक बदल केला. या बदलामुळे तिची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून व्यवसायाची टिकाऊ वाढ साधता आली आहे. याचे प्रत्यंतर म्हणजे, या कालावधीत कंपनीच्या एबिटामध्ये 81.79 टक्के सीएजीआर वाढ, तर करपश्चात नफ्यात तब्बल 99.36 टक्क्यांची सीएजीआर वाढ नोंदली गेली आहे. ‘एफ अॅंड एस’च्या अहवालानुसार, वित्तीय वर्ष 2025 मध्ये कंपनीने आपल्या समकक्ष कंपन्यांमध्ये भांडवली परतावा 36.43 टक्के आणि इक्विटीवरील परतावा 33.91 टक्के सर्वाधिक नोंदवला. या वर्षात कंपनीचा महसूल 1,922 दशलक्ष रुपये इतका होता. यातून कंपनीच्या धोरणात्मक फेरबदलाची परिणामकता आणि कामकाज सुधारण्यातील योगदान दिसून येते.
कंपनीचा कारखाना उत्तराखंडातील रूडकी येथे असून 31 मार्च 2025 पर्यंत त्याची एकूण स्थापित क्षमता 4,051 दशलक्ष युनिट्स होती. येथे तीन स्वतंत्र उत्पादन युनिट्स आहेत. ती विशिष्ट औषधांच्या श्रेणीसाठी नियामक अटींना अनुसरून उभारली गेली आहेत. विविध औषधांचे वर्गीकरण स्वतंत्र ठेवण्यास ही रचना सोयीस्कर ठरते. रूडकी येथे असल्याने या केंद्राला उत्तराखंडच्या विकसित आणि सहाय्यक औषधनिर्मिती परिसंस्थेचा लाभ मिळत आहे.
औषध उद्योगातील वाढत्या मागणीचा विचार करून कंपनीने 12,007 दशलक्ष युनिट्स क्षमतेचे नवे उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखली आहे. यात उच्च क्षमतेचा ओएसडी ब्लॉक, एक समर्पित ऑंकोलॉजी युनिट, पेनिसिलिन-आधारित संपूर्ण पोर्टफोलिओ (गोळ्या, कॅप्सूल, कोरडे सिरप आणि इंजेक्शनसह) आणि एक अतिरिक्त एसव्हीपी उत्पादन ब्लॉक असणार आहे. तसेच अॅम्प्युल्स, व्हायल्स, ड्राय पावडर इंजेक्शन व फॉर्म-फिल-सील डोळ्यांचे थेंब या स्वरूपांसाठी निर्जंतुक उत्पादन रेषा असतील. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी ‘आयपीओ’च्या ‘फ्रेश इश्शू’मधून उभारलेल्या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
पॅन्टोमाथ कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या आयपीओसाठी एकमेव बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे. कोटेक हेल्थकेअर कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर नोंदविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मागील तीन महिन्यांत पॅ’न्टोमाथ’कडून होणारी ही चौथी नोंदणी असून मागील 45 दिवसांत त्यांनी 4 आयपीओ हाताळले आहेत.


