आळंदी स्थित पसायदान गुरूकुलाला भेट देऊन बाहेर पडलो आणि एक वेगळाच आनंद मी अनुभवला. “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती” ह्या काव्यपंक्ती मला आठवल्या. आईवडिलांना भरणपोषण करणे कठीण झाले, अशा दारिद्र्य पीडित कुटुंबातील, ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरवले आहे, अगर ज्यांना एकल पालक आहे, अशी मुले तेथे आश्रयाला होती. आपण वंचित आहोत, पोरके आहोत याचा मात्र लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर कोठेही दिसत नव्हता. नियमित शाळेत जाणारी, संगीत आदि कलांमध्ये रस घेणारी, आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणारी अत्यंत श्स्तिबध्द मुले तेथे आढळली. आश्रमाचे प्रभारी योगेश्वर वाघ यांनी आई-वडिलांची उणीव कधीच वाटू दिली नाही. आईची माया ह्या मुलांना दिली. ते त्या वंचित मुलांसाठी खऱ्या अर्थाने माऊलीची भूमिका वठवत आहेत. वाघ यांचे आश्रमाप्रती असलेले समर्पण पाहून माझी मान आपोआपच त्यांच्या समोर झुकली. मी माझ्या कुटुंबियांसोबत माझा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यासाठी, माझा आनंद ह्या मुलांशी शेअर करण्यासाठी आलो होतो. त्याकारणाने मला ह्या मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
कोण आहेत योगेश्वर वाघ – पसायदान गुरूकुल सारखी संस्था उभारणारे योगेश्वर वाघ कोण आहेत, हे जाणून घ्यायलाच हवे. आळंदी (पुणे) इतक्या लांब अंतरावर अनाथाश्रम उभारणारे वाघ हे विदर्भाचेच. मूळचे वर्धा जिल्ह्याचे. दोन महिन्याचे असताना आईचे छत्र हरवले. पुढील संगोपनाची जबाबदारी आजी गंगुबाई यांनी स्वीकारली. वाघ लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे झाले असले तरी आजीची माया, त्याग आणि संघर्ष त्यांनी जवळून पाहिला होतो. ते संस्कार त्यांच्यावर झाले. निराधार, वंचीत लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे हे संस्कार त्यांच्यावर जडले. वर्धा जिल्ह्यात शालेय शिक्षणाला सुरूवात करून पुढे ते एमबीए झाले. गांधी जिल्हा अशी वर्धा जिल्ह्याची ओळख असून, गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव वाघ यांच्यावर आहे. मुंबईत पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण त्यांना मिळाली. सामाजिक दायित्वाची मुळातच ओढ असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही. ते ज्ञानोबाच्या आळंदीला आले. तेथे त्यांना दोन निराधार मुले भेटली. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ह्यातूनच त्यांच्या मनात पसायदान गुरूकुलाचे बीज अंकुरले.
गुरूकुलाची स्थापना : वरील मुलांच्या निवासाची पत्र्याच्या शेडमध्ये व्यवस्था केली. अशा प्रकारे 2017 मध्ये पसायदान गुरूकुलाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. आश्रमातील मुलांची वाढती संख्या आणि वाढत्या अडचणी पाहून समाजातील दानशूर मंडळींनी मदतीचा हात द्यायला सुरूवात केली. मुलांच्या खाण्यापिण्याचे, निवासाचे प्रश्न सोडविण्यास ते पुढे आले. बसवराज माटुरे यांनी आळंदीला 1000 चौ.फु. जागा वापरण्यास दिली. पुढे-पुढे जागा अपुरी पडू लागली. तेव्हा भाड्याच्या जागेत आश्रम सुरू करण्यात आले. महेश सावंत (यवतमाळ), सचीन कडू व त्यांचा वात्सल्य परिवार, टाटा मोटर्सचे कर्मचारी, ब्रम्हांड संस्थान, संदीप सपाट, संतोष हुसगे इ. च्या योगदानातून आळंदी जवळच्या परिसरात 1850 चौ. फुट जागा उपलब्ध झाली आहे. बांधकाम होण्याची गरज आहे, त्याकरिता प्रतीक्षा आहे आर्थिक मदतीची. 2 मुलांनी सुरू झालेला पसायदानचा हा संसार आता तब्बल 70 मुलांचा झाला आहे.
पसायदान : आश्रमाला पसायदान हे नाव देण्यामागे संत ज्ञानेश्वर यांच्या प्रार्थनेचा संदर्भ आहे. ह्या प्रार्थनेव्दारे ज्ञानेश्वरांनी ईश्वराला दु:खीतांच्या जीवनातील अंधार दूर करून सर्वांना सुखी करण्याची विनवनी केली आहे. त्यास अनुरूप अनााथ, वंचित मुलांना आधार, प्रेम आणि उज्वल भविष्यासाठी शिक्षण मिळावे हाच आश्रमाचा हेतु आहे.
मुलांची दिनचर्या आणि स्वावलंबन : आश्रमात पंचमुखी शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात आला असून, स्वावलंबन, शिस्त, शिक्षण आणि त्याबरोबरच कला, कौशल्य मुलांनी शिकावे हा आश्रमाचा प्रयत्न आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय असून, काहींनी स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे. एकंदरीतच अत्यंत अभिनंदनीय असे कार्य हे आश्रम करीत आहे.
लेखन : रणजित चंदेल (9422866931)


