*
पुणे, दि.३०: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
सदरची प्रारूप यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. तसेच सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे कार्यालय, तहसील कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय येथे प्रारूप मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन नव्याने मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.
मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करावे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.
०००


