प्रसिद्ध चित्र व शिल्पकार संजीव संकपाळ यांचे उद्गार
निसर्गचित्रकार अशोक साळुंखे यांच्या ‘चित्रकर्म’ प्रदर्शनाला सुरवात
चित्रप्रेमींना रंगसमृद्ध वातावरणातील चित्रांकन अनुभवण्याची संधी
पुणे, दि. १९ सप्टेंबर, २०२५ : चित्रकार अशोक साळुंखे यांच्या चित्रांतून रंगलेपन, काळाचे अंकन आणि वातावरणनिर्मिती यांची वेगळी अनुभूती मिळते. त्यांची चित्रे कलर हार्मनी साधणारी आहेत, असे उद्गार प्रसिद्ध चित्र व शिल्पकार संजीव संकपाळ यांनी काढले. ‘साळुंखे यांची चित्रे शांत मूड निर्माण करतात, हे त्यांच्या चित्रांचे वेगळेपण आहे, असेही संकपाळ म्हणाले. गेली १९ वर्षांहून अधिक काळ या कलेला वाहून घेतलेले आणि निसर्गचित्रणासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध नेचर लँडस्केप आर्टिस्ट अशोक साळुंखे यांच्या ‘चित्रकर्म’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळिक, स्वतः चित्रकार साळुंखे, चित्रकार लुएल लोपेझ, अतुल डाके, आर्ट पुणे फाऊंडेशनचे संजीव पवार आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. चित्रकर्म हे प्रदर्शन रविवार २१ सप्टेंबर पर्यंत घोले रस्त्यावरील राजा रवीवर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे.
संकपाळ पुढे म्हणाले, “चित्रकार साळुंखे यांच्याशी मित्र, विद्यार्थी, सहाध्यायी तसेच बंधुत्वाचे नाते आहे. त्यांच्या चित्रप्रवासाचा मी सुरवातीपासूनचा साक्षीदार आहे. ॲनिमेशनपासून सुरवात करत ते आज उत्तम निसर्गचित्रकार म्हणून स्थिरावले आहेत, याचा अतिशय आनंद वाटतो. साळुंखे यांची चिकाटी, सातत्य, चित्रांविषयीचे प्रेम, आस्था यांच्याशी मी परिचित आहे. करड्या रंगाच्या विविध छटांमधून त्यांनी चित्रांत उभे केलेले वातावरण अनोखे आहे. त्यांच्या चित्रांमधील छायाप्रकाशाचे खेळ सुंदर आहेत. ग्रामीण वातावरण, निसर्गचित्रण यांतून मातीचा गंध जाणवतो आणि ही चित्रे एका वेगळ्या विश्वात नेतात”.
योगेश मुळिक म्हणाले, “ही चित्रे पाहताना अशा निवांत जागी जायला हवे, अशी भावना पाहणाऱ्यांच्या मनात जागी होते. गावातले वातावरण, निसर्गदृष्ये, तळी-नदी-समुद्र यांचे सान्निध्य दर्शवणारी चित्रे जिवंत वाटतात”.
मनोगत मांडताना चित्रकार साळुंखे म्हणाले, “आयटी क्षेत्रांत बरीच वर्षे कार्यरत होतो. एका क्षणी ते सोडून, मनासारखे काम करण्याचा निर्णय घ्यावासा वाटला. प्रदर्शनातील ५० टक्क्यांहून अधिक चित्रे प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणीच रेखाटली आहेत. ॲक्रेलिक आणि जलरंग, ही माध्यमे मला अधिक जवळची वाटली, त्यामुळे बरेच काम या माध्यमांमधील आहे. माझ्या कुटुंबियांचा, पत्नीचा या प्रवासात मोठा सहभाग आहे. निसर्ग हीच माझ्या चित्रांची मुख्य प्रेरणा आहे”, असेही ते म्हणाले. संजीव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.


