पुणे, दि. 20 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) निसर्गामधील विविध जीवजंतूंच्या आकारांमागील तंत्रांचा सहीसही वापर मानवी कामासाठी लागणाऱ्या आकृतीबंधांत (डिझाईन) समाविष्ट करण्यात येणारा बायोमिमिक्री (निसर्गानुकरण) हा अभ्यास कक्ष (सेल) नुकताच सुरू झाला.
बीएनसीए तर्फे सुरू झालेल्या या कक्षात तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या मिळून 25 विद्यार्थिनींनी या विषयाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली असून वर्षभरात 50 विद्यार्थिनीना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या विद्यार्थिनींनी बायोमिमिक्रीवरील एक पोस्टर प्रदर्शनही नुकतेच भरवले होते. बीएनसीएच्या बायोमिमिक्री कक्षातर्फे बीकेपीएसचे वास्तू रचनाशास्त्र महाविद्यालय आणि सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेबीनारही आयोजित करण्यात आला.
यासंबंधी बोलताना बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले की, पौर्वात्य देशातील तांत्रिक शिक्षणात या विषयावरील अभ्यासक्रम नवीन असून तो वास्तूरचनाशास्त्रातील (आर्किटेक्चर) रचनाकृतींसाठी तंतोतंत लागू पडू शकतो. म्हणूनच तो आम्ही बीएनसीएमध्ये अभ्यासक्रमाला जोडून सुरू केला आहे. निसर्ग आणि पर्यावरणातील विविध संकल्पना या मानवाला वरदान ठरल्या असल्याने त्यातील तत्त्वांचा थेट वापर आता वास्तू रचनाशास्त्राच्या अभ्यासातून आम्ही करत आहोत. यातून वास्तूरचनाशास्त्रात तयार करण्यात येणाऱ्या आकृतीबंधांमधून (डिझाईन) पर्यावरणातील बदल आणि कमीत कमी कार्बन पदचिन्हे निर्माण करणाऱ्या वास्तू उभारणे शक्य होईल.
बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे म्हणाले की, या कक्षातील कार्य हे बायोमिमिक्रीशास्त्रासंबंधी जागृती करण्यासाठी होत आहे. त्याची सुरूवात नुकत्याच एका कार्यशाळेतून झाली. त्याला जोडून मग वास्तूरचनाशास्त्र विभागासाठी तयार करण्यात येणारे पूरक अभ्यासक्रम आम्ही ठरवणार आहोत. पदवी आणि आवश्यकता भासल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमी यातून निश्चित करण्याची योजना आहे. निसर्गातील जैविक घटक आणि प्रक्रियांमधून तयार केलेली सामुग्री, संरचना आणि प्रणालींचा वापर नवनवीन मानवनिर्मिती आकृतीबंध (डिझाईन) आणि उत्पादनांमध्ये करणे यातून शक्य होणार आहे.
बीएनसीएतील बायोमिमिक्रीशास्त्र कक्ष प्रमूख प्रा. हर्षदा ब्रह्मे म्हणाल्या की, निसर्गाने स्वत:च वेळोवेळी सिद्ध केलेले मार्ग व उपाय मानवनिर्मित आकृतीबंधातून शहर नियोजनात वापरता येतात. तसेच त्यासाठी लागणारे साहित्य पर्यावरणपूरक व शाश्वत कसे राहील याचाही बायोमिमिक्रीशास्त्रात विचार केला जातो. या विषयाचा संबंध हा पर्यायाने संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या 17 शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांशी जोडला गेला आहे. या विषयाचे पाश्चात्य देशांमधील शिक्षणात असणारे महत्त्व लक्षात घेता आपल्याकडेही 11वी व 12वी च्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांपासून बायोमिमिक्री शास्त्रासंबंधी जागृती निर्माण करणे शक्य आहे. तसेच दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या निसर्गापासून प्रेरणा घेत विविध कल्पनांवरील बायोमिमिक्री गोष्टींच्या निर्मितीसंबंधीच्या स्पर्धेतही ही मुलं आणि बीएनसीएच्या विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील.
बीएनसीएतील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शुभदा कमलापूरकर म्हणाल्या की, यासाठी बायोमिमिक्री हा मुल्याधारित विषय शिकवणाऱ्या विविध पाश्चात्य विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांशी आम्ही संबंध वाढवणार असून त्यातून विद्यार्थी व शिक्षकांसाठी आदान-प्रदान उपक्रमही राबवला जाईल. हे करत असताना बायोमिमिक्री विषयाशी संबंधीत काही संशोधन प्रकल्पही हाती घेणे शक्य आहे. त्याचा उपयोग जगभरातील या क्षेत्रात काम करण्याचा कार्यानुभव बीएनसीएच्या विद्यार्थिनींना मिळू शकेल. तसेच या संशोधनाची नाळ थेट हरीत बांधकामावर प्रभाव करणाऱ्या व्यवसायाशीही जोडता येईल. तसेच बायोमिमिक्री विषयाचा अभ्यासक्रमातील अंतर्भाव हा आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असाच आहे.
वास्तुरचनाशास्त्राच्या पदवीबरोबरच बायोमिमिक्रीशास्त्रातील प्रमाणपत्र तसेच पदव्युत्तर प्रमाणपत्राचा वापर विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध कामांमध्ये तसेच व्यवसायांतही करता येईल. वास्तूरचनाशास्त्राबरोबरच, अभियांत्रिकी, फॅशन डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन या विविध क्षेत्रातील विद्यार्थी आणि अभ्यासकांबरोबर एकत्र काम करत नवीन उर्जा व तांत्रिक क्षेत्रात नवीन पर्याय व मार्ग शोधून काढताना बायोमिमिक्रीचा प्रत्यक्ष अवलंबही करता येईल.यातून जलव्यवस्थापन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक काळजीचे विषयही हाताळता येणे शक्य होईल. या विभागातून भविष्यात विकासाची काही धोरणे ठरवणे, जागतिक साहचर्यातून काही आंतर्विद्याशाखीय पातळीवर काही नवीन शोध व संकल्पना राबवणे आणि पर्यावरणीय जबाबदारी असणाऱ्या क्षेत्रांवर भर देणे शक्य होईल, असे प्रा. ब्रह्मे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, बायोमिमिक्रीशास्त्रात निसर्गातून शिकताना त्यातील तत्त्वांचा वापर मानवी जीवनात त्याच सर्जनशीलतेने करणे शक्य होईल. हवामान बदल आणि पर्यावरणीय जबाबदाऱ्यांच्या जाणीवेतूनच बीएनसीएतील वास्तूरचनाशास्त्र अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव आम्ही करत आहोत. डिझायनर्स, अभियंते आणि शास्त्रज्ञ यांना निसर्गाची क्षमता, त्यातील तांत्रिक प्रतिभा आणि लवचिकतांचा वापर विविध रचनाकृती (डिझाईन) तयार करण्याच्या आव्हानांना तोंड देताना प्रेरक ठरेल. या विषयाच्या निमित्त वास्तूरचनाशास्त्राबरोबरच अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक क्षेत्रांमध्येही त्याचा वापर करणे
शक्य होईल.


