पुणे, दि. २३ सप्टेंबर २०२५ : ‘मराठीची ताकद कोट्यवधींची आहे. जगभरात विखुरलेली मराठी मंडळी मराठी उत्सव – सण अतिशय उत्साहाने आणि परंपरा जपत साजरे करतात. हे मराठीपणाचे सत्त्व नव्या पिढीपर्यंत नेण्याची नितांत गरज आहे’, असे आवाहन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी केले. या आवाहनापाठोपाठ नायगांवकरांनी आपल्या मिष्किल शैलीतल्या पण तिरकस आशयाच्या कवितांची दिलखुलास मैफलही रंगवली.
निमित्त होते हिंदू महिला सभा या संस्थेच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव प्रारंभाचे. ग्राहक पेठेच्या उपाध्यक्ष संध्या भिडे यांच्या हस्ते संस्थेच्या नवरात्रोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले, संध्या भिडे, संस्थेच्या ज्येष्ठ सभासद मेधा महाजन, प्रसिद्ध इतिहास संशोधक मंदार लवाटे आणि अशोक नायगांवकर व्यासपीठावर उपस्थित होते. नवरात्रोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असल्याचे औचित्य साधून विशेष स्मरणिकाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
नायगांवकर पुढे म्हणाले, ‘संस्थात्मक कार्यासाठी महाराष्ट्र सर्वदूर ओळखला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी असे अनेक मराठी सण-उत्सव जगभरात विखुरलेले मराठी बांधव साजरे करतात. आता गरज आहे, ती मराठीपणाची, मराठी संस्कृतीची आणि संस्कारांची ही पालखी नव्या पिढीच्या खांद्यावर सोपवण्याची. त्या कार्याला असे उपक्रम पूरक ठरू शकतात’. एखादी संस्था तसेच उत्सवपरंपरा सातत्याने ९० वर्षे सुरू ठेवणे हे महत्त्वाचे कार्य आहे, अशा शब्दांत नायगांवकरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
सुप्रिया दामले यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची तसेच नवरात्रोत्सवाची माहिती दिली. स्मरणिकेसाठी योगदान दिलेल्या मंदार लवाटे यांचा तसेच अन्य लेखकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्तरार्धात अशोक नायगांवकरांनी हलक्याफुलक्या शैलीत हास्याचे फवारे उडविणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. पुरुषप्रधान समाजाच्या मानसिकतेचे नेमके वर्णन टिपणाऱ्या त्यांच्या कवितांनी उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. पुणे हे कित्येक सुधारणांचे, उपक्रमांचे शहर, येथील प्रथा, परंपरांचा नायगांवकरी पद्धतीने त्यांनी समाचार घेतलाच, पण उपरोधिक आशयातून श्रोत्यांना अंतर्मुखही केले. घराला ‘सरपण’ देणारं घर त्यांच्या कवितेतून भेटलं आणि जीवनावश्यक गोष्टींसोबत अनेक ‘जेवणावश्यक’ बाबीही उलगडल्या. ‘मुळाक्षरां’च्या कवितेतून अभिजात मराठीची सद्यस्थितीही समोर आणली तर ‘सतार’ कवितेतून दिडदा दिडदा चे स्वरही उमटले. प्रत्येक कविता सादर करण्यापूर्वी नायगांवकरांनी कथन केलेली पार्श्वभूमीही हास्याचे फवारे उडवणारी ठरली. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.


