पुणे,24 सप्टेंबर 2025 : पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल तर्फे नुकतेच राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा निमित्ताने कॉर्निया रिट्रिव्हल प्रशिक्षण (नेत्रपटल प्राप्त करण्याची शस्त्रक्रिया) सत्राचे आयोजन करण्यात आले होते. एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल आणि एमआयएमईआर मेडिकल कॉलेज ॲन्ड जनरल हॉस्पिटल,तळेगाव येथे या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
भारतामध्ये प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या कॉर्नियांची (नेत्रपटल) कमतरता असताना, हा उपक्रम देशभरात संकलित होणाऱ्या कॉर्निया व दृष्टी पुनर्संचयित करणाऱ्या प्रत्यारोपणांची मागणी यातील दरी कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.यावर्षी नेत्रपेढी व कॉर्नियल रिट्रिव्हल या विषयांवर विशेष प्रशिक्षण देऊन भविष्यातील नेत्ररोग तज्ञांचे कौशल्यांना बळ देण्यावर भर देण्यात आला.
पदव्युत्तर विद्यार्थी व फेलोशिप प्राप्त व्यक्ती यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना सैध्दांतिक ज्ञान,थेट प्रात्यक्षिके व कॉर्नियल रिट्रिव्हल प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या सत्रांचे नेतृत्व एका तज्ञ टीम तर्फे करण्यात आले असून यामध्ये एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया विभागप्रमुख व नेत्रपेढी अधीक्षक डॉ.शिल्पा जोशी, नेत्रतज्ञ डॉ.स्नेहल घाडगे,नेत्रतज्ञ डॉ.पूजा अंधारे,नेत्रपेढीचे उपव्यवस्थापक सतीश कुरपड, नेत्रदान समुपदेशक उर्मिला प्रभुणे व मनिषा पांढरे तसेच नेत्रपेढी तंत्रज्ञ सुशांत यादव यांचा समावेश होता. एमआयएमईआर येथील नेत्ररोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.स्मिता पवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यशाळांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणारे शैक्षणिक मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष प्रशिक्षण यांचा समावेश होता. तसेच कॉर्नियल रिट्रिव्हलशी संबंधित नैतिक पैलूंवरही चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच कौशल्ये प्रदान करून अशा प्रकारचे उपक्रम वैद्यकीय कौशल्य वाढवण्याबरोबरच नेत्रदानाच्या जीवन बदलणाऱ्या परिणामांबद्दल सहानुभूती आणि जागरूकता निर्माण करत आहेत.
एव्हरीडे हिरोज ही यंदाच्या वर्षीची संकल्पना असून दाते,त्यांचे कुटुंबीय,समुपदेशक,तंत्रज्ञ आणि शल्यचिकित्सक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे एखाद्याला दृष्टी परत मिळवून देण्याच्या योगदानावर प्रकाश टाकते.


