पुण्यातील पहिलीच अशी प्रक्रिया
२०१९ मध्ये एफडीएकडून मान्यता प्राप्त ही प्रक्रिया दोन प्रमुख रक्तवाहिन्यांमधील छिद्र बंद करण्यासाठी वापरली जाते – विशेष करून कमी वजन असलेल्या बाळांमध्ये उपयुक्त
पुणे,21 फेब्रुवारी २०२४ : केईएम हॉस्पिटल पुणे मधील डॉक्टरांच्या टीम तर्फे 23 आठवड्यांमध्ये जन्मलेल्या व पेंटंट डक्टस आर्टिरिऑसस (पीडीए) ही स्थिती असलेल्या बाळावर पिकोलो डिव्हाईस क्लोजर प्रक्रिया करण्यात आली. केईएम मधील बहुविभागीय टीमने इंटरव्हेंशनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ.पंकज सुगावकर आणि वरिष्ठ नवजात तज्ज्ञ डॉ.तुषार पारीख यांच्या नेतृत्वाखाली या लहान बाळावर (मुलगा) उपचार केले. कॅथलॅबमध्ये एक तास चाललेल्या प्रक्रियेत नवजात तज्ञ,तंत्रज्ञ व परिचारिका यांचा समावेश होता.अशा प्रकारे करण्यात आलेली पुण्यातील ही पहिलीची प्रक्रिया असून 23 आठवड्यांच्या मुदतपूर्व जन्मलेले बाळ वाचणे हे देखील एक दुर्मिळ यश आहे. यापूर्वी २०१८ मध्ये डॉ.तुषार पारीख यांच्या नेतृत्वाखाली केईएम हॉस्पिटल पुणे येथेच २३ आठवड्यांच्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला वाचविण्यात यश मिळाले होते.
याबाबत अधिक माहिती देताना केईएम हॉस्पिटलमधील वरिष्ठ नवजात तज्ज्ञ डॉ.तुषार पारीख म्हणाले की, हे बाळ आपल्या जन्माच्या वेळेस अत्यंत गंभीर परिस्थितीत होते.अशा बाळांसाठी एनआयसीयूची प्रक्रिया म्हणून फंक्शनल इको कार्डिओग्राफी (बाळाच्या हृदयाचे आरोग्य) च्या चाचण्या करण्यात आल्या.त्यात या बाळाला पेटंट डक्टस आर्टिरिऑसस (पीडीए) ही स्थिती असल्याचे निष्पन्न झाले.
पीडीए हा जन्मजात हृदयविकार असून यामध्ये 2 प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये सतत एक छिद्र असते,या छिद्राला डक्टस आर्टेरिऑसस असे म्हणतात.आईच्या पोटात असताना,बाळाला रक्तप्रवाह करणार्या हा गर्भाशयातील प्रणालीचा एक भाग आहे.हे छिद्र सहसा जन्मानंतर लवकर बंद होते.जर ते उघडे राहिले तर त्या स्थितीला पेटंट डक्टस आर्टिरिऑसस असे म्हणतात. छिद्र मोठे असल्यास व उपचार न केल्यास अनेक गुंतागुंत निर्माण होतात.
डॉ.पारीख म्हणाले की,अशा परिस्थितीत आम्ही नेहमी औषधांचा डोस देतो,मात्र याबाबतीत दोन्ही रक्तवाहिन्यांमधील हे छिद्र औषधांनी बंद झाले नाही.त्यामुळे फुफ्फुसावर भार पडत होता आणि बाळ दीड महिने व्हेंटीलेटरवर अवलंबून होते. बाळाच्या हृदयाच्या स्थितीमुळे आम्ही व्हेंटिलेटर काढू शकत नव्हतो. पालकांचे समुपदेशन केल्यावर आम्ही पिकोलो डिव्हाईस प्रक्रिया करायचा निर्णय घेतला.जन्मापासून या काळापर्यंत बाळाचे वजन 586 ग्रॅम पासून 1600 ग्रॅम पर्यंत वाढले होते.
केईएम हॉस्पिटल पुणे मधील इंटरव्हेंशनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ.पंकज सुगावकर म्हणाले की, याबाबतीत औषधांचा छिद्र बंद करण्यात उपयोग होत नसल्याने शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. पिकोलो डिव्हाईस तंत्र येण्याआधी पाठीच्या बाजूने बरगड्यांच्या मध्ये छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जायची. मात्र या बाळाची परिस्थिती अतिशय गंभीर व गुंतागुंतीची होती. हे बाळ बहुतांश वेळ व्हेंटिलेटरवर अवलंबून होते आणि हृदय शस्त्रक्रिया ही अतिशय कठिण होती. अशा बाळांच्या बाबतीत अभिनव अशी पिकोलो डिव्हाईस प्रक्रिया ही वरदान व जीव वाचविणारी ठरू शकते.
डॉ.पंकज सुगावकर पुढे म्हणाले की,ही प्रक्रिया कॅथलॅबमध्ये केली गेली.पिकोलो डिव्हाईस हे उपकरण तीन चकत्यांच्या आकाराचे असून एकावर एक थरांच्या स्वरूपात असते.त्याला डिलिव्हरी सिस्टिममध्ये बसविण्यात येते आणि मांडीमध्ये एक लहान छेद द्वारे रक्त वाहिन्यांच्या मार्गातून हृदयापर्यंत नेले जाते आणि छिद्र बंद केले जाते.हे होण्याकरिता एक कॅथेटर आणि शीत (आवरण) एकमेकांस तिरपे (क्रॉस) ठेऊन त्यावर उपकरण बसविले जाते आणि सर्वांत मोठ्या रक्तवाहिनीपर्यंत नेण्यात येते आणि तिथून छिद्र बंद केले जाते. मुदतपूर्व बाळांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असते.
६ ते ९ महिन्यांत या उपकरणावर पेशींचा एक थर उगवतो आणि हृदयाचा एक भाग बनतो.ही एक वेळ करण्याची प्रक्रिया असून उपकरणे बदलण्याची गरज नाही. त्याचबरोबर कुठल्या औषधांची गरज नाही. या प्रक्रियेचे अनेक फायदे असतात. कमीत कमी छेद, संसर्गाचा कमी धोका आणि लवकर बरे होणे अशा फायद्यांमुळे गंभीर परिस्थितीत ही प्रक्रिया सुयोग्य ठरते.
डॉ.पारीख पुढे म्हणाले की,हे बाळ आता १० महिन्यांचे झाले असून त्याचे आरोग्य चांगले आहे. नियमित पाठपुराव्याचा भाग म्हणून केल्या जाणाऱ्या इको चाचणीत हे उपकरण सुस्थितीत आणि योग्य ठिकाणी आल्याचे दिसले . बाळाचे वजन वाढत असून त्याचे आरोग्य प्रगतीपथावर आहे ही आनंदाची बाब आहे असे डॉ . सुगावकर म्हणाले


