Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवविधा भक्तीच्या संतरचनांची अनोखी अनुभूती विदुषी नंदिनी राव आणि उस्ताद रईस...

नवविधा भक्तीच्या संतरचनांची अनोखी अनुभूती विदुषी नंदिनी राव आणि उस्ताद रईस बाले खान यांचे श्रुतिमनोहर सादरीकरण

पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ – श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा भक्तीच्या नऊ अवस्था वर्णन करणाऱ्या देशभरातील अनेक संतांच्या रचनांचा श्रुतिमनोहर आविष्कार रसिकांनी अनुभवला. विदुषी नंदिनी राव गुजर आणि उस्ताद रईस बाले खान, या गायक कलाकारांनी भक्तीरचनांची ही मैफल रंगवून, श्रोत्यांना भक्तीरसाची अनुभूती दिली.

 

निमित्त होते, कन्नड संघ, पुणे व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भावसंगीत – भक्तीलहरी’ या विशेष सांगीतिक मैफलीचे. ‘सताररत्न’ या पदवीने ओळखल्या जाणाऱ्या घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस बाले खान आणि संगीत नाटक अकादमीचा २०२२-२३ सालच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने सन्मानित पुण्यातील युवा गायिका विदुषी नंदिनी राव गुजर यांनी आपल्या वादक कलाकारांच्या साथीने भक्तीच्या नवविधा स्वरांतून साकारल्या. वाडिया महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रो. गुरुराज कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून, या संतरचनांविषयीचे विवेचन केले.

 

एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या भक्तीरचनांच्या मैफलीत मराठी, हिंदी, कन्नड, तेलगु, तमिळ, गुजराती, बंगाली, पंजाबी.. अशा अनेक भाषांत रचल्या गेलेल्या संतरचनांचा समावेश होता. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत कबीर, संत मीरा, पुरंदरदास, कनकदास, तुलसीदास, रविदास, नरसी मेहता, गोपालदास..अशा संतश्रेष्ठांच्या या रचनांमधून भक्त आणि ईश्वरामधील विविध नात्यांचा मागोवा संगीताच्या साथीने कलाकारांनी घेतला.

 

नंदिनी राव यांनी कन्नड, तमिळ, तेलुगु भाषेतील रचनांची सुंदर प्रस्तुती केली. उस्ताद रईस खा यांनी मराठी, हिंदी, गुजराती रचनांचे सादरीकरण केले. निवडक रचनांवर स्फूर्ती राव आणि मेघा हरतळीकर यांनी नृत्याविष्कार केला.

 

यशवंत (मृदंगम्), अजय चंद्रमौळी (व्हायोलीन), अर्ष शहा (गिटार), हेमंत जोशी (तबला), ओजस रानडे (हार्मोनियम), संतोष नाईक (बासरी), अनिष ठुसे (तालवाद्ये), कोरस – श्रीनिधी कुलकर्णी, सई मनोहर, अनघा मुतालिक देसाई यांनी साथसंगतीतून रंगत वाढवली.

 

आदीशंकराचार्य विरचित भज गोविंदम् (रागमालिका) पासून सुरू झालेली ही भावभक्तीची स्वरगाथा ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानापर्यंत उत्तरोत्तर भावपूर्ण होत गेली. किरवाणी, दुर्गा, यमन, षण्मुखप्रिया, बिभास, वृंदावनी सारंग, आसावरी – दरबारी, मोहनकल्याणी, मालकंस, खमाज, पटदीप, मधमाद सारंग, मिश्र कल्याण, मिश्र पहाडी, सारंग, भैरवी… अशा रागसंगीतातील अनेक रागांच्या माध्यमातून, कलाकारांनी संतरचनांमधील भक्तीभावाचे दर्शन रसिकांना घडवले.

 

सर्वसामान्य भक्तांच्या सोयीसाठी सगुण साकार झालेले ईश्वराचे मूळ निर्गुण निराकार कसे आहे, ईश्वराच्या प्राप्तीसाठी भक्तीचा नवविधा मार्ग संतांनी कसा वर्णन केला आहे, याचे सविस्तर वर्णन प्रो. गुरुराज कुलकर्णी यांनी केले.

 

कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी म्हणाल्या, “ही मैफल म्हणजे केवळ सादरीकरण नाही. हा भक्तीच्या चळवळीचा प्रवास आहे, जो प्रादेशिकता, भाषेच्या मर्यादा ओलांडून प्रवाहित झाला. गायन, वादन, नृत्य, काव्य यांच्या माध्यमातून आपले वैविध्याने समृद्ध असे सांस्कृतिक वैभव, संतांनी सर्वसामान्यांसमोर आणले आहे”. राधिका शर्मा यांनी परिचय करून दिला. प्राचार्य ज्योती कडकोळ यांनी

आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments