पुणे : आजच्या काळात देशभरात मुलींवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर शि. प्र. मंडळी संचालित एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, पुणे येथे विद्यार्थ्यांनी स्त्री सन्मान, समानता आणि परस्पर आदर करण्याची प्रतिज्ञा केली. शाळेतील मुलांनी पुढाकार घेत ‘आयुष्यात कधीही मुलींचा वा महिलांचा अवमान करणार नाही आणि त्यांचा नेहमीच आदर करीन’ अशी शपथ घेत आगळेवेगळे कन्यापूजन मुलांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांच्या प्रतिज्ञेला प्रतिसाद म्हणून मुलींनीदेखील मुलांचा सन्मान राखू अशी प्रतिज्ञा घेतली.
रमा कुलकर्णी म्हणाल्या, मुलींवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी समाजाची विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. या दृष्टीने लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आदर, संवेदनशीलता आणि समता यांचे मूल्य रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या उपक्रमातून मुला–मुलींमध्ये परस्पर आदराची भावना, समानतेची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात
आला.


