प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि साहित्यिक अच्युत गोडबोले यांचे मत
प्रसिद्ध वास्तूविशारद शिरीष दसनूरकर यांच्या ‘शिरीषबोली’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे, दिनांक, ११ ऑक्टोबर :आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात कामाचे स्वरूप बदलणार असून त्याचा स्वीकार करण्याचे भान ठेवायला हवे, अन्यथा आपण मागे पडू असे मत मध्ये प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांनी लिहिलेल्या ‘शिरीषबोली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि त्यांनी काढलेल्या पाचव्या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन अच्युत गोडबोले व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी गोडबोले बोलत होते. सेनापती बापट रोडवरील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी दसनूरकर यांच्या हस्ते अच्युत गोडबोले आणि मृणाल कुलकर्णी यांचा चित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दसनूरकर यांनी आपल्या चित्र आणि पुस्तक विक्रीमधून मिळालेला निधी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मेक माय ड्रीम फाउंडेशन, अक्षरसरिता आणि उमेद फाउंडेशन या तीन संस्थांना यावेळी प्रदान केला.
अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळे सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अनेक चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे या तंत्राने अगदी जशीच्या तशी साकारली आहेत, त्यामुळे चित्रकार मंडळींच्या मनात देखील भीती दडली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रामध्ये डेटावरून पॅटर्न शिकला जातो. त्यामुळे सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले असल्याचे गोडबोले यावेळी म्हणाले.
चॅट जीपीटीचा वापर करून आपल्या एका फॅनने आपल्यावर तयार केलेली हिंदी कविता त्यांनी यावेळी ऐकवली. अवघ्या पाच सेकंदात या फॅनने कविता केली आणि सहा सेकंदात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने त्याला चाल लावण्यात आली. हे गाणे गोडबोले यांनी यावेळी प्रेक्षकांना ऐकवले. या एकूण प्रकारामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहायाने अनेक गोष्टी करणे सुलभ झाले असताना भविष्यात गायक, वादक, संगीतकार यांचे काय होणार असा सवाल गोडबोले यांनी यावेळी उपस्थित केला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमाचा वापर करून एखादा लेखक ज्या प्रकारचे लिखाण करतो, तसे लिखाण होऊ शकते. एखादा चित्रकार ज्या शैलीची चित्रे काढतो, तशी चित्रे तयार होऊ शकतात असे जरी असले तरी आपण वैयक्तिक आयुष्य जगताना सामाजिक जडघडणीतून जे अनुभव घेतो, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला करणे शक्य नाही. एखादे कथानक एआय फुलवू शकतो, पण त्याच्याकडे स्वतःची कल्पकता नसल्याचे गोडबोले यावेळी म्हणाले.
आपल्या शैलीमधील चित्रे चोरल्याबद्दल अनेक चित्रकारांनी एआयच्या विरोधात खटले दाखल केले आहेत. संगीत, सिनेमा, चित्रकला अशा अनेक क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आगामी १० ते १५ वर्षांमध्ये म्हणजे २०३५ -४० पर्यत आपल्याला अनेक बदल पाहायला मिळू शकतात. त्यामुळे कामाचे स्वरूप बदलणार आहे. आपण कायम सतर्क राहून नवीन गोष्टीचा स्वीकार करण्याचे भान ठेवायला हवे, अन्यथा आपण मागे पडू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.वेळ आणि पैसा याचा सदुपयोग कसा करावा, याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मृणाल कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
दसनूरकर हे कलासक्त व्यक्तिमत्व आहे. आपल्या कामातून वेळ काढून ते लिखाण, चित्रकला हे छंद जोपासत आहेत. आपण देखील लिखाण केले तर विचार करू आणि त्यामधून समृद्ध होऊ, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.पुस्तकांच्या लिखाणामधून आपल्याला मित्रांची संपत्ती मिळाली. अनेक लोकांशी आपण जोडले गेलो. आपल्या या उपक्रमांमधून मिळणारी रक्कम सामाजिक कार्य करण्यासाठी देण्याची संधी मिळाल्याची भावना शिरीष दसनूरकर यांनी यावेळी व्यक्त केली.राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. रोहित दसनूरकर यांनी आ
भार मानले.