पुणे, दि. 18 : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सातारा शहरातील वारशाचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल टूल्स’च्या माध्यमातून त्याचे दस्तावेजीकरण करण्याचे तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी नुकतेच जाहीर केले. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील सांस्कृतिक अध्यापन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर यांनी या उपक्रमाच्या समन्वयात प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून जबाबदारी घेतली.
डॉ. लाटकर म्हणाल्या की, या उपक्रमाचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व असल्यामुळे हा स्थानिक वारसा आता डिजिटल माध्यमांचा वापर करून जतन केला पाहिजे. त्यासाठी लवकरच एक स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. दिवसभर चाललेल्या सातारा शहर व परिसरातील या उपक्रमावर आधारित एक स्वतंत्र सचित्र अहवाल मांडणारे पुस्तकही प्रकाशित होईल.
केंद्र सरकारच्या ‘हिस्टॉरिक सीटी सीरीज 2025’ या उपक्रमाच्या अंतर्गत सातारा शहराचे पुनरावलोकन करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, ड्रोनाह फौंडेशन, आयकोमॉस इंडिया, हेरिटो पोलिस, बीएनसीए, अल्ट्रीम पब्लिशर्स, राज्य पुरातन विभाग (पुणे), इंटॅक (पुणे), यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (सातारा), निरामन हेरिटेज ॲण्ड कन्सल्टंन्सी आणि नयनतारा फौंडेशन ऑफ अर्बन स्केचर्स यांनी एकत्र येऊन हा उपक्रम हेरिटेज वॉक, चर्चासत्र आणि तज्ज्ञांची भाषणे या माध्यमातून साजरा केला. त्याच्या मुख्य समन्वयाची जबाबदारी आर्किटेक्ट प्रतिक्षा दळवी यांनी पार पाडली.
या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून छत्रपती वृशालीराजे भोसले, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, प्रतिक्षा दळवी, डॉ. वैशाली लाटकर, आर्किटेक्ट स्वराली सगरे, आर्किटेक्ट सुहास तळेकर व आर्किटेक्ट राखी बेगमपुरे उपस्थित होते. शिखा जैन यांनी ‘हिस्टॉरिक सिटी ऑफ सातारा’ या विषयावर बीज भाषण केले. सातारा शहरातील ऐतिहासिक राजवाडा व अन्य वास्तुंना भेटी देण्यासाठी पायी भेट देण्याच्या कार्यक्रमात सातारा शहरातील नागरिक व विद्यार्थीही सहभागी झाले.
या माध्यमातून नागरिकांमध्ये ऐतिहासिक वारशासंबंधी जागृती मोहिम राबवण्यात आली. साताऱ्यातील ऐतिहासिक राजवाड्यात भरत असणाऱ्या प्रतापसिंह राजे हायस्कूल या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्रातील आयुर्विमा आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे संस्थापक वा. गो. चिरमुले यांनी शिक्षण घेतले होते, असे या शाळेचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी सांगितले.
वहाणे म्हणाले की, ऐतिहासिक क्षत्रात साताऱ्याचे योगदान मोलाचे असून येथील मंदिरे तसेच परिसरातील प्रतापगडसारखा किल्ल्याने जागतिक वारसा यादीतही महत्वाचे स्थान मिळवले आहे. नागरिक म्हणून देशाच्या इतिहासाबरोबरच सातारकरांनी आपला स्थानिक इतिहासही जतन केला पाहिजे व तशी चळवळ उभी राहिली पाहिजे.
स्वराली सगरे म्हणाल्या की, ऐतिहासिक वारशातून त्या वास्तू टिकवण्याबरोबरच त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कथा व माहिती जिवंत ठेवणे व ती पुढच्या पिढ्यांना सुपूर्त करणे तितकेच महत्त्वाचे
आहे.


