Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी ज्ञानभाषा - प्रा. डॉ. दिनेश रसाळ...

संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी ज्ञानभाषा – प्रा. डॉ. दिनेश रसाळ एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा

पुणे, २९ ऑगस्ट: संस्कृत ही केवळ देवभाषाच नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी एक समृद्ध ज्ञानभाषा आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी आणि व्यापक प्रसारासाठी समाजात अधिक प्रभावी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत भाषा विभागाचे प्रा. डॉ. दिनेश रसाळ यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर संस्कृत अँड इंडियन नॉलेज सिस्टिम्सच्या वतीने संत ज्ञानेश्वर भवनातील वर्ल्ड पीस लायब्ररी येथे संस्कृत दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा. डॉ. दत्ता दांडगे, प्रसिद्ध गप्पाष्टककार व वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. विष्णू भिसे, संस्कृत भारती पुणे प्रांताचे प्रा. पै, पीस स्टडीज विभागाचे डॉ. भागवत, सेंटर फॉर संस्कृत अँड आयकेएसचे समन्वयक डॉ. संदीप ढिकले उपस्थित होते.

हा कार्यक्रम एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या आशीर्वादाने आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.

डॉ. दिनेश रसाळ म्हणाले, “संस्कृतचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो आग्नेय आशिया (इंडोनेशिया, कंबोडिया) आणि मध्य आशियापर्यंत पसरला आहे. थोडक्यात, संस्कृत ही केवळ एक भाषा नसून ती भारताच्या ज्ञान, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा जिवंत वारसा आहे.”

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “भाषेचा सदुपयोग हा केवळ संवादापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांशी समरस होण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये मूल्यसंवर्धनासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हावा.”

कुलगुरू प्रा. डॉ. दत्ता दांडगे म्हणाले, “विद्यापीठाने स्थापनेपासूनच मूल्याधिष्ठित शिक्षण आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धन व प्रसाराला विशेष प्राधान्य दिले आहे. आधुनिक शिक्षणाची सांगड भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि प्राचीन ज्ञानपरंपरेशी घालणे ही एमआयटी डब्ल्यूपीयूची वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक परंपरा आहे. संस्कृत भाषेचा केवळ प्रचार नव्हे, तर तिच्या अध्ययन, वापर आणि साधनेचे डेमोक्रेटायझेशन व्हायला हवे. एमआयटीचे संस्कृत आणि IKS सेंटर त्यात भरीव योगदान देत आहे.”

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेंटर फॉर संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा केंद्राचे डॉ. संदीप ढिकले, डॉ. सचिन गाडेकर, डॉ. दयिता रॉय आणि प्रा. अमृता कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल प्रेम आणि अभिरुची वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने त्यांना श्रीमद्भगवद्गीतेची प्रत भेट म्हणून प्रदान करण्यात आली.

पीस स्टडीज विभागातील प्राध्यापक आणि वर्ल्ड पीस लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

सूत्रसंचालन प्रा. सचिन गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप ढिकले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments