पुणे,२९ ऑक्टोबर २०२५ : जनसेवा सहकारी बँक लि.,हडपसर, पुणे च्या ५३ व्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणारा “जनसेवा पुरस्कार २०२५” हा कर्ण- बधिर मुलांना बोलते करण्यासाठी झटणारी “कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच, पुणे” या संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्काराचे यंदाचे २६ वे वर्ष असुन बँकेचा यंदाचा ५३ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम शनिवार, दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता विठ्ठल तुपे नाट्यगृह, माळवाडी, हडपसर येथे होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रक्कम रु.१,०१,०००/- धनादेश स्वरूपात सन्मान चिन्ह, मानपत्र अशा प्रकारचे आहे. सदर कार्यक्रमास पुणे शहरातील लोकप्रतिनिधी व अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ही माहिती जनसेवा सहकारी बँक लि.चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष रवी तुपे, संचालक राजेंद्र वालेकर,संचालक सचिन शिरुडे, संचालक राजन वडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या ५३ वा वर्धापन दिन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.डॉ.श्री.प्रविणजी दबडघाव, प्रांत कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, हे लाभले असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.श्री.गणेश शिंदे, मोटिव्हेशनल स्पीकर हे उपस्थितांना “जीवन सुंदर आहे ” या विषयावर संबोधित करणार आहेत.
दरवर्षी बँकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बँक “ जनसेवा पुरस्कार ” प्रदान करीत असते.जनसेवा पुरस्कार सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये निरपेक्षपणे आणि नि:स्वार्थीपणे कार्य करणाऱ्या संस्थेस प्रदान केला जातो.
बँकेच्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्त बँकेने दि.२४ ऑक्टोबर १९९८पासून दरवर्षी सामाजिक, आरोग्य, सेवा, शैक्षणिक इ.क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थाना ‘ जनसेवा पुरस्कार ’ प्रदान करण्यास सुरुवात केली आहे.
सन 2020 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ “अस्तित्व प्रतिष्ठान ”, वीर, ता. पुरंदर या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रक्कम रु. 1,01,000/- धनादेश स्वरुपात, सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
सन 2021 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ – “ तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास”, वेल्हे या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रक्कम रु. 1,01,000/- धनादेश स्वरुपात, सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
सन 2022 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ – “ पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन , पुणे” आणि “वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर” या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रक्कम प्रत्येकी रु. 51,000/- धनादेश स्वरुपात, सन्मान चिन्ह, मानपत्र,श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
जनसेवा पुरस्कार – 2024 चा “जनसेवा पुरस्कार” पुण्यातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि वंचित समाजाच्या आरोग्यासाठी आणि सक्षमतेसाठी झटणाऱ्या “निरामय सिंहगड रोड, पुणे” या संस्थेस प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रक्कम रु. 1,01,000/- धनादेश स्वरुपात,सन्मान चिन्ह, मानपत्र अशा प्रकारचे होते.
*बँक स्थापनेची पार्श्वभूमी*
हडपसर सारख्या तत्कालीन ग्रामीण भागातील समविचारी कार्यकर्त्यांनी (कै.मामासाहेब हजारे, कै.आबनावे गुरुजी, श्री.रघुनाथ कचरे, श्री. मधुकरराव टेमगिरे, कै. रामचंद्र मारुती रासकर) यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुरवातीस भिशी मंडळ स्थापन केले. त्याचा व्यवहार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर आपली स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि त्यातूनच 1972 साली जनसेवा सहकारी बँक,हडपसर,पुणे ची स्थापना करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता उभा करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य असा प्रमुख हेतू होता. बँकेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीच्या संचालकांनी समाजातील सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करून चांगला फायदा मिळवून दिल्यामुळे बँक अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि “ बहुत जनांसी आधारू” अशी बँकेची प्रतिमा तयार झाली.
* 53 वर्षाच्या प्रगतीचा आलेख *
बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी बँकेच्या स्थापनेपासून दाखविलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे बँक आत्तापर्यंत प्रगती करू शकलेली आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला 53 वर्ष पूर्ण होणे म्हणजे स्थिरता, सक्षमता, परिपक्वता व व्यापक दृष्टीकोन यादृष्टीने पहिले जाते. यापुढेही असाच विश्वास आणि पाठींबा हा बँकेस प्राप्त होईल अशी खात्री आहे.
जनसेवा सहकारी बँक लि.,हडपसर, पुणे हि बँक एक अग्रगण्य सहकारी बँक असुन गेली अनेक वर्षे पुणे जिल्ह्यात नॉन शेडूयल बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दि.31.03.2025 अखेर रु.1956.79 कोटी ठेवी आणि रु.1046.67 कोटींची कर्जे असुन बँकेचा एकूण व्यवसाय रु.3003.46 कोटींचा आहे. सध्या बँकेच्या एकूण 28 शाखा असुन त्यापैकी पुणे व पिंपरी चिंचवड शहर येथे 21, पुणे जिल्ह्यात 03, सातारा जिल्ह्यात 03 आणि ठाणे येथे 1, असा शाखाविस्तार आहे. बँकेची स्वतःची 25 ATM असून Rupay Card द्वारे बँकेच्या ग्राहकांना अन्य बँकांच्या जवळपास 125000 पेक्षा अधिक ATM द्वारे व्यवहार करता येतात. बँकेने स्वतःचा पॅरा बँकिंग विभाग सुरु केलेला असुन त्यामार्फत विमा व्यवसाय आदि सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात. बँकेने ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा सुरु केलेली आहे. UPI (Unified Payments Interface) द्वारे बँक ग्राहकांना Google pay, Phone pay, Pay-tm , Mobile app with additional facility ही सुविधा मोबाईल बँकिंगद्वारे उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच Internet Banking View Mode only आणि Rupay Platinum Contactless card ही सुविधा देखील उपलब्ध करुन दिलेली आहे. जनसेवा बँक ग्राहकांना आर्थिक सेवा चांगल्याप्रकारे देत असून, त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये योगदान देत असते.
* बँकेचे सामाजिक दायित्व व समाज कल्याण कार्य *
जनसेवा बँक सामाजिक उत्तरदायित्व मोठ्या कर्तव्य भावनेने तसेच कोणताही गाजावाजा न करता पार पाडीत आहे. बँक दरवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांना मदत करीत असते. त्यामध्ये शैक्षणिक, नैसर्गिक आपत्ती, समाज उपयोगी कार्य तसेच विशेष गरजा असणाऱ्या संस्थांचा प्रामुख्याने समावेश असतो. अशा सामाजिक संस्थांना जनसेवा बँक नेहमीच मदत करीत असते.
1. एखतपूर गावाचा विकास – जनसेवा सहकारी बँकेने सासवडजवळील एखतपूर हे गाव सर्वांगीण विकासासाठी मदतीचा हात दिलेला आहे.
2. पुरंदर तालुक्यातील खळद या गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी बँकेने भरघोस आर्थिक सहाय्य केले आहे. यामुळे आज गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटलेला आहे.
3. दि. 14 एप्रिल रोजी दरवर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याठिकाणी येणाऱ्या बंधू भगिनींसाठी पेयपानाची व्यवस्था केली जाते.
4. हळद-कुंकू – मकरसंक्रांति निमित्त दरवर्षी सभासद, ग्राहक व सेवकांच्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ हडपसर परिसरात आयोजित करण्यात येतो
.


