Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाईप 5 डायबेटिसवर अधिक संशोधन गरजेचे : लँसेटमधील प्रकाशित शोधनिबंधाचा निष्कर्ष

टाईप 5 डायबेटिसवर अधिक संशोधन गरजेचे : लँसेटमधील प्रकाशित शोधनिबंधाचा निष्कर्ष

पुणे,10 नोव्हेंबर 2025 : कुपोषण किंवा अल्प पोषणामुळे मधुमेह होऊ शकतो का? त्याची नेमकी कारणे आणि योग्य उपचार समजण्यासाठी अधिक संशोधन व दस्ताऐवजीकरण गरजेचे आहे,याकडे लँसेंट मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाने लक्ष वेधले आहे. केईएम हॉस्पिटल पुणे येथील डायबेटिस युनिटचे प्रमुख डॉ.चित्तरंजन याज्ञिक हे या शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक आहेत.

 

 

जानेवारी 2025 मध्ये भारतात वेल्लोर येथे विविध देशांमधून आलेल्या तज्ञांची बैठक झाली.टाईप 1 आणि टाईप 2 या सामान्यपणे आढळणाऱ्या मधुमेह प्रकारांशिवाय दुर्मिळ अनुवंशिक आणि इतर दुय्यम मधुमेह प्रकारांपासून याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी याला टाईप 5 डायबेटिस असे म्हटले गेले आणि यावर संमती झाली.याचा मूळ उद्देश्य मधुमेहाशी संबंधित सर्व भागधारकांचे लक्ष वेधून पुढील संशोधनाला प्रोत्साहन देणे होते.

 

 

जगप्रसिध्द संशोधक व केईएम हॉस्पिटल पुणे येथील डायबेटिस युनिटचे प्रमुख डॉ.चित्तरंजन याज्ञिक म्हणाले की,मधुमेह (टाईप 2) हा सहसा अतिपोषणाशी जोडला जातो.परंतु गेल्या 75 वर्षांत वारंवार असे नोंदवले गेले आहे की,अनेक मधुमेही हे अतिपोषित किंवा लठ्ठ नसतात.विशेष करून विकसनशील देशांमध्ये हे दिसून येते.अशी लोकं सामान्य वजनाची,सडपातळ किंवा कमी वजनाची असतात.याचे वर्णन याआधी कुपोषण संबंधित मधुमेह असे केले गेले आहे.हे वर्णन प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशांच्या बाबतीत केले गेले आहे.त्यामध्ये आफ्रिका,जमैका,भारत यासारख्या अनेक शतके गरीब आणि आता विकसनशील देशांचा समावेश आहे.

 

 

मधुमेह हा एक गुंतागुंतीचा आजार असून यामध्ये अनुवंशिक व पर्यावरणीय घटक कारणीभूत ठरू शकतात. दुर्मिळ अनुवंशिक प्रकार मोठ्या प्रमाणावर उत्परिवर्तनामुळे होतात.पण अनेकदा माफक अनुवंशिक जोखमीचे घटक आणि लक्षणीय पर्यावरणीय उत्तेजित घटकांमुळे होऊ शकते.

 

 

टाईप 1 डायबेटिस (टीआयडी) या स्थितीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडामधील इन्शुलिन उत्पादक बीटा पेशींवर हल्ला करतात.त्यामुळे शरीरात इन्शुलिनची कमतरता निर्माण होते किंवा इन्शुलिन तयार होत नाही.टाईप 1 मधुमेह हा बहुतांश वेळेस लहान मुले किंवा किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो.टाईप 1 चे एकंदर मधुमेह रूग्णांमध्ये प्रमाण हे 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.सर्वांत सामान्यपणे आढळणारा प्रकार हा टाईप 2 असून याचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे व यामध्ये अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक यामधील परस्पर संवादाचा परिणाम आहे.यात पर्यावरणीय घटकाचा प्रभाव जास्त असतो.

 

 

नव्याने नोंद होत असलेल्या पुराव्यांमध्ये निदर्शनास येत आहे की,मातेचे पोषण कमी असणे, ताण-तणाव,लठ्ठपणा किंवा शरीरास हानिकारक पदार्थ अशा गर्भाशयातील परिस्थितीमुळे अर्भकाच्या अवयवांच्या विकासावर परिणाम करू शकतात आणि मधुमेहाची जोखीम वाढू शकते.जन्माला येणाऱ्या बालकाचे वजन कमी किंवा जास्त या दोन्ही परिस्थितीत जोखीम वाढवू शकते.भारतीय बाळांचे जन्माला येताना सरासरी वजन हे जागतिक स्तरावर सर्वांत कमी असते आणि त्यामुळे जोखीम वाढते.नंतरच्या आयुष्यात चुकीची जीवनशैली,निष्क्रियता,ताण-तणाव,झोपेचा अभाव यामुळे मधुमेहाची जोखीम आणखी वाढते.तरूण भारतीयांमध्ये कमी बीएमआय स्थितीत देखील मधुमेहाचा धोका जास्त असतो.याचे कारण गर्भावस्थेत अल्प पोषणामुळे उद्भवणारे एक विशिष्ट शरीर प्रकार ज्याला थिनफॅट असे संबोधले गेले आहे.जन्माला येताना कमी वजन आणि नंतरच्या आयुष्यात लठ्ठपणा ही सर्वांत टाईप 2 मधुमेहासाठी सर्वात जोखीमकारक स्थिती आहे.महिलांमध्ये यामुळे गर्भावस्थेत मधुमेहाचा धोका देखील वाढतो व यामुळे बाळांमध्ये मधुमेहाची जोखीम वाढते.

 

 

विविध प्रकारच्या अनुवंशिक व पर्यावरणीय घटकांमुळे टाईप 2 मधुमेह हा अत्यंत विषम आहे.यात देखील उपप्रकार ओळखण्याची प्रक्रिया ही स्वीडन मध्ये सुरू झाली आणि भारतात पुणे आणि चेन्नईमध्ये आपल्या देशातील उपप्रकाराचे वर्णन केले गेले.स्वीडन येथील रूग्णांच्या तुलनेत भारतातील (पुणे,अहमदाबाद व आसाम) च्या उपप्रकारांची तुलना केल्यास असे दिसून येते की,भारतातील 2/3 रूग्ण हे शरीराने बारीक असून इन्शुलिनची कमतरता असलेल्या प्रकारांमध्ये आहेत.गरीब लोकसंख्येमध्ये आयुष्यभर अल्प पोषणामुळे उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या मधुमेहाला आता टाईप 5 डायबेटिस म्हणून संबोधले गेले आहे.

 

 

लँसेटमध्ये प्रकाशित झालेल्या शोध निबंधामध्ये टाईप 5 मधुमेहींची वैशिष्टये परिभाषित करून या संकल्पनेचा सारांश देण्यात आला आहे.व्यापकपणे विचार करता हे रूग्ण सामाजिक,आर्थिकदृष्टया वंचित लोकसंख्येतील आहेत व त्यांच्यामध्ये कमी बीएमआय, इन्शुलिनची कमतरता, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे.परंतु टाईप 1 डायबेटिससारख्या किटोॲसिडॉसिस (तीव्र इन्शुलिन कमतरता) हे त्यांच्यामध्ये विकसित होत नाही.विशिष्ट चाचण्या केल्यावर ते इन्शुलिन संवेदनशील असल्याचे आढळून येते,मधुमेहाला कारणीभूत कुठलेही प्रमुख अनुवंशिक उत्परिवर्तन दिसून येत नाही आणि स्वादुपिंडाला नुकसान झाल्याचे आढळून येत नाही.त्यामुळे या उपप्रकाराचे अनुवंशिक घटक परिभाषित करण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.

 

 

याआधी अशा प्रकारच्या मधुमेहाला मालन्युट्रिशन रिलेटेड डायबेटिस असे आजवर म्हटले जात होते.जागतिक आरोग्य संघटनेने 1985 मध्ये हा एक वेगळा प्रकार म्हणून ओळखले होते.मात्र पुरेशा माहितीसाठ्या अभावी 1999 मध्ये याची ओळख काढून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय डायबेटिस फेडरेशन तर्फे एप्रिल 2025 मध्ये बँकॉक येथे झालेल्या बैठकीत टाईप 5 डायबेटिसला मधुमेहाचा उपप्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आणि यावर अधिक संशोधन करण्यासाठी कार्यकारी मंडळ स्थापित करण्यास पोत्साहित केले.

 

 

डॉ.याज्ञिक म्हणाले की,या मान्यतेमुळे हा उपप्रकार स्वीकारण्यास मदत होईल आणि संशोधनासाठी अधिक निधी मिळू शकेल.या उपक्रमामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

टाईप 5 डायबेटिस ही केवळ ओळख नसून पुढील कृतीसाठी एक निर्णायक दिशा आहे. टाईप 2 मधुमेहींना आपण कमी खायला आणि जास्त चालायला सांगतो,मात्र टाईप 5 मधुमेही हे आधीच कमी खातात आणि कठोर परिश्रम करतात त्यामुळे टाईप 5 डायबेटिस हा संशोधनाच्या दृष्टीने नवीन आव्हाने निर्माण करतो.

 

 

डॉ.याज्ञिक म्हणाले की,अनुवंशिक घटक,गर्भावस्थातील स्थिती,पौष्टिक घटक अशा अनेक बाबींबाबत तातडीने अभ्यास करण्याची आणि त्यानुसार उपचारांची रचना करण्याची गरज आहे.हवामान बदल,स्थलांतर,दुष्काळ आणि संघर्षामुळे कुपोषण पुन्हा उद्भवत असताना टाईप 5 मधुमेहाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.याचे योग्य दस्ताऐवजीकरण आणि संशोधन यामुळे प्रतिबंधाच्या दृष्टीने धोरणात्मक रचना,योग्य उपचाराचा मार्ग आपल्याला कळू शकेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments