Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे - राज्यपाल आचार्य...

विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे – राज्यपाल आचार्य देवव्रत · विद्यापीठाच्या गुणांकन वाढीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेले टास्क फोर्स स्थापन करून ते दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करतील अशी प्रणाली निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

 

राजभवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

 

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, विद्यापीठे ही विद्या आणि संस्कारांची केंद्रे असावीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने जोडले जावेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद व सहकार्य वाढले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. तसेच खेळ, एनसीसी, एनएसएस यासारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तंदुरुस्त शरीर आणि सुदृढ मन हेच चांगल्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

विद्यापीठांनी रोजगारक्षम अभ्यासक्रम विकसित करावेत जे थेट उद्योगजगताशी निगडित असतील. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण जितके गुणवत्तापूर्ण, तितकी शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल. प्रशिक्षण केंद्रांचा दर्जा अधिक उंचवण्यावर भर देण्याचे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

 

विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये यांविषयी संवेदनशील केले पाहिजे. जीवनमूल्यांची प्रेरणा देण्याऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी परस्पर सहकार्याने सतत संवाद ठेवला पाहिजे. नियोजन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम केल्यास महाराष्ट्र निश्चितच देशातील आदर्श शैक्षणिक राज्य बनेल, असा विश्वासही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.

 

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यशाळेचे आयोजन दर तीन महिन्यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत करण्यात येते. या पुढेही कार्यशाळेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याची विनंती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी राज्यपालांना केली.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी महाराष्ट्राला ‘एज्युकेशन हब’ तयार करण्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७ — राज्य सार्वजनिक विद्यापीठांची भूमिका निश्चित करणे, या विषयावर आधारित पीपीटीचे सविस्तर सादरीकरण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments