पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली. विविध प्रकारच्या भाज्यांचा भोग श्री काळभैरवनाथाला दाखाविण्यात आला. मंदिराच्या गाभा-यात करण्यात आलेली ही आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी देखील मोठी गर्दी केली.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भाज्यांची आकर्षक आरास करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक शाकंभरी पौर्णिमेनिमित्तची आरास अनेक वर्षे केली जाते.
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात केलेली भाज्यांची आरास पाहण्याकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


