Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिबट्याच्या हल्ल्यात मानेच्या नसांमध्ये ईजा झालेल्या मुलावर पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली...

बिबट्याच्या हल्ल्यात मानेच्या नसांमध्ये ईजा झालेल्या मुलावर पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली कॅरोटिड स्टेंटिंग शस्त्रक्रिया

पुणे,६ जानेवारी २०२६ : बिबट्याच्या हल्ल्यात मानेच्या नसांमध्ये ईजा झालेल्या 8 वर्षीय मुलावर केईएम हॉस्पिटल पुणे येथे डॉ.आनंद आलुरकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या कॅरोटिड स्टेंटिंग प्रक्रिया केली. धमनीत छिद्र पडल्यामुळे निर्माण झालेला फुगवटा या प्रक्रियेमुळे दुरूस्त करण्यात आला. उपचार न झाल्यास ही अवस्था जीवघेणी ठरू शकली असती.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावातील एका शेतकरी कुटुंबासाठी डिसेंबरमधील एक नेहमीसारखा दिवस होता,मात्र अचानक एका बिबट्याने त्यांच्या आठ वर्षांच्या मुलावर हल्ला केला आणि मान पकडून त्याला उचलले आणि निघून जाऊ लागला. मुलाचे वडील दुचाकीवरून सतत हॉर्न वाजवत बिबट्याच्या मागे गेले. सुदैवाने बिबट्याने मुलाला सोडून दिले आणि तो पळून गेला. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला तात्काळ स्थानिक दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यात त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले व पुढील उपचारांसाठी त्याला केईएम हॉस्पिटल पुणे येथे आणण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती देताना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल न्युरोलॉजिस्ट डॉ.आनंद आलुरकर म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती व मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली होती. त्यामुळे त्या ठिकाणी फुगवटा तयार झाला होता. ही अवस्था स्युडो ॲन्युरिझम म्हणून ओळखली जाते, यामध्ये धमनीची भिंत कमकुवत होऊन फुगवटा निर्माण होतो आणि त्यामुळे धमनी फाटण्याची आणि परिणामी जीवघेणा रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होतो.

 

या स्थितीचे डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) या तपासणी द्वारे निदान करण्यात आले. डीएसए ही कॅथलॅबमध्ये करण्यात येणारी मेंदूच्या नसांची एक प्रगत अँजिओग्राफी आहे.

 

आम्ही कॅरोटिड स्टेंटिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मेंदूच्या धमनींच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केली जाणारी बिनटाकयाची शस्त्रक्रिया आहे.ही प्रक्रिया जांघेतील धमनीतून केली जाते. स्टेंटिंगसाठी ‘कव्हर्ड स्टेंट ग्राफ्टचा’ वापर करून धमनीतील छिद्र बंद करण्यात आले. या मुलाला दोन दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला.

 

डॉ.आनंद आलुरकर म्हणाले की, कॅरोटिड स्टेंटिंग ही प्रक्रिया केईएम हॉस्पिटल पुणे येथे गेल्या दोन दशकांपासून स्ट्रोक (पक्षाघात) आलेल्या वयस्कर रूग्णामधील ग्रीवा धमनी (कॅरोटिड आर्टरी) मधील अडथळा दूर करण्यासाठी वापरली जाते.मात्र या रूग्णाचे लहान वय,मानेत झालेली ईजा,त्याला कारणीभूत परिस्थिती यामुळे वैद्यकीयदृष्टया हे एक दुर्मिळ यशांपैकी

एक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments