पुणे, ता. ८
मातृत्वाच्या शक्तीला घाबरुन पुरूष सत्ताक पध्दतीने स्रीला विवाहाच्या दावणीशी बांधून टाकले आहे. स्रीवर बंधने नका टाकू. परस्पर विश्वास ठेवला तर बंधने टाकायची गरज नाही. स्री वाद हा मदतीचा हात देतो. त्यामध्ये स्री हा शब्द आल्याने लोकांना वाटते तो बायकांचा आहे. प्रत्यक्षात स्री वाद हा सगळ्या प्रकारच्या शोषणाविरूध्द लढणारा आहे. क्रौर्यामागे पुरूषांची मानसिकता दिसते. ती बदलायला हवी, असे मत स्री वादाच्या पुरस्कर्त्या गीताली वि. म. यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीच्या लेकींचा पतीसह सत्कार व प्रकट मुलाखत हा कार्यक्रम गांधी भवन कोथरूड येथे गुरूवारी सायंकाळी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिळून सा-याजणी गीताली. वि. म. बोलत होत्या. मानवी हक्क, कायदे आणि दलित मानवी हक्क निरीक्षण या विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रमांचे समन्वयन व मार्गदर्शन करणा-या सलमा कुलकर्णी मोरे, आदिवासी महिला आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथी समुदायाच्या जीवनावर अत्यंत महत्त्वाचे संशोधन व लेखन केलेल्या संशोधक पत्रकार मीनाज लाटकर तसेच संविधान आणि स्त्रीवादी विचारधारा हाच एकूण लेखन, विचारांचा गाभा असलेल्या आंतर भारती शाखा पुणे च्या कार्याध्यक्ष सविता कुरुंदवाडे यांचा स्त्री सूक्त आणि झिंगणार मी ही लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची पुस्तके देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अरुणा तिवारी होत्या. यावेळी ममता क्षेमकल्याणी यांनी सावित्रीच्या लेकींशी संवाद साधत त्यांच्या जीवनानुभवाला उजाळा दिला.
गीताली वि. म. म्हणाल्या की, आपल्या हातातील सत्ता जाईल या भितीने पुरूष आक्रमक होत आहेत. आरक्षणाने स्रीयांना पदे मिळत असली तरी त्यावर पुरूषच वर्चस्व दाखवत आहेत. आता जे भयंकर साचेकरण करण्याचे काम चालु आहे ते चुकीचे आहे. एकासारखे दुस-याने असण्याचे काही कारण नाही. आपण सर्वांनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पुरूषात बदल होतोय पण तो मंद गतीने. समतेतून आपल्याला चांगले जगता येईल.
मीनाज लाटकर म्हणाल्या की, मुस्लिम सणांचे अस्तित्व समाज माध्यमांवर मर्यादित पध्दतीने दाखवले जाते. रमजान ईद चे सांस्कृतिक संबंध येत नाहीत. मुस्लिमांविषयी फार कमी लिहिले जाते. मुस्लिम समाजातील शाकाहार, त्यांच्यातील कला, कौशल्य, मानवता वाद याविषयी इतरांना फारसे माहिती नाही. एकमेकाची गळा भेट घेणारे वा नमाज पठण करणारा जमाव म्हणजे ईद अशी प्रतिमा दाखवली जाते. त्यामुळे दीवाळी अंकाच्या धर्तीवर रमजान ईद काळात नब्ज अंक काढण्याचा निर्णय घेतला. समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मशिदीच्या बाहेर पुस्तक स्टॉल लावले. माझ्यासाठी ही सलोख्याची चळवळ आहे. हा संवाद मी नब्ज च्या माध्यमातून करत आहे.
अध्यक्षा अरुणा तिवारी म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांना त्या काळात किती त्रास झाला असेल याचा विचार मनाला अस्वस्थ करतो. तसाच त्रास आत्ताच्या काळात घडणा-या घटनांनी देखील होतो. सोनोग्राफी मशिनचा शोध आपण लावला नाही. मात्र पाश्चात्य तंत्रज्ञानाचा आपण गैरवापर करत आहोत. व्हाईट कॉलर कामगार महिलाना भेदभावाला सामोरे जावे लागते तर ऊस तोड कामगार महिलांचे गर्भाशयच काढण्याचे अमानवीय प्रकार
आहेत. समाजाच्या मानसिकतेत सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आज देखील आहे.आजच्या कार्यक्रमातून सहजीवनाचा वेगळा दृष्टीकोन समाजापुढे मांडला गेला याचे समाधान वाटते.
सविता कुरुंदवाडे यांनी ऐकविलेल्या कथा या कवितेला रसिकांनी दाद दिली.
यावेळी सुहास कुरुंदवाडे, डॉक्टर इम्रान, प्रदिप मोरे, डॉ. डी एस खोरे, ज्ञानेश्वर मोळक , शैलजा मोळक आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक लक्ष्मिकांत देशमुख यांनी केले. आभार अन्वर राजन यांनी मानले.


