Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्मार्ट मोबिलिटीमध्ये सायबर सुरक्षा हे एक आव्हान

स्मार्ट मोबिलिटीमध्ये सायबर सुरक्षा हे एक आव्हान

पुणे, दि. ३ फेब्रुवारी, २०२६ : वाहनउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चर्चे दरम्यान सायबर सुरक्षा हे स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन च्या विकासातील प्रमुख आव्हानांपैकी एक आव्हान असल्याचे समोर आले असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. एआरएआय च्या वतीने नुकतेच मोशी येथील पीआयईसीसी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ अर्थात एसआयएटी २०२६ च्या समारोप समारंभावेळी डॉ. मथाई बोलत होते.

 

समारोपप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी एसआयएटी २०२६ च्या यशस्वी आयोजनासाठी एआरएआयचे कौतुक केले. याबरोबरच भारत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सुरक्षित, स्वच्छ आणि हरित गतिशीलतेच्या महत्त्वावर वर्मा यांनी भर दिला. त्यांनी प्रमुख राष्ट्रीय उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी प्रमाणन, संशोधन आणि तंत्रज्ञान सक्षमीकरणामध्ये एआरएआयच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखलही घेतली.

 

यावेळी हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य तंत्रज्ञ अधिकारी विक्रम कसबेकर, एसएई इंडियाचे अध्यक्ष डॉ. जी. नागराजन आणि एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. रेजी मथाई म्हणाले, “सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी नाविन्यपूर्ण मार्ग” ही यावर्षी एसआयएटी २०२६ च्या १९ व्या आवृत्तीची संकल्पना होती. या पार्श्वभूमीवर या परिषदेत संपन्न झालेल्या तज्ज्ञांच्या विविध विषयांवरील चर्चे दरम्यान स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी सायबर सुरक्षा हे अनेक महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणून समोर आले. याबरोबरच ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) प्रमाणीकरण, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा, रेंजची चिंता आणि स्मार्ट मोबिलिटीसाठी अशा सोल्यूशन्सची परवडणारी किंमत ही स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्यादरम्यान येणारी आणखी काही आव्हाने असून नजीकच्या भविष्यात आपल्याला या सर्व आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.”

 

डॉ. मथाई पुढे म्हणाले की, पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांसोबतच हायब्रीड वाहनांवर भर देणे, चार्जिंगचा वेळ कमी करण्यासाठी आणि खर्च वाचवण्यासाठी स्मार्ट ग्रीडचे एकत्रीकरण करणे, ५ जी आणि समर्पित रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांना इतर नेटवर्क्ससोबत वायरलेस पद्धतीने डेटाची देवाणघेवाण करण्यास सक्षम करणारी व्ही टूएक्स (V2X) कम्युनिकेशन प्रणालीचा वापर करणे या उपायांमुळे रस्त्यावरील सुरक्षा, वाहतूक कार्यक्षमता आणि स्वायत्त ड्रायव्हिंग सुलभ होईल शिवाय २०३० पर्यंत कार्बन तटस्थतेसाठी धोरणात्मक सहकार्यावर देखील आपण लक्ष केंद्रित करू शकू.

 

एसआयएटी २०२६ मधील काही इतर महत्त्वाच्या निष्कर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत भारतीयांसाठी भारतीयांनी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या स्वदेशी प्रयत्नांसाठी आवश्यक परिसंस्था (इकोसिस्टम) असण्याची गरज आणि स्थानिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहितीही डॉ. मथाई यांनी दिली.

 

१९ व्या एसआयएटी २०२६ दरम्यान २५०० हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आणि १३ हजारांहून अधिक अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट दिली. एसआयएटी तब्बल ६४ तांत्रिक सत्रे, ८ प्लीनरी सत्रांमध्ये सादरीकरणे आणि २ चर्चात्मक कार्यक्रम संपन्न झाले. याबरोबरच सुमारे २४८ तांत्रिक शोधनिबंध या परिषदेत सादर करण्यात आले त्यांपैकी ३३ शोधनिबंध हे आंतरराष्ट्रीय होते. ही परिषद ६४ समांतर सत्रांमध्ये पार पडली, जिथे ८० हून अधिक शोधनिबंधांचे मूल्यांकन केले गेले. विविध श्रेणींमधील सर्वोत्तम ३ शोधनिबंधांना प्रमाणपत्र देत त्यांचा गौरव देखील करण्यात आला. टाटा मोटर्सला सर्वोत्तम शोधनिबंधासाठी पारितोषिक प्रदान करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments