गडचिरोली, महाराष्ट्र:
पुणे येथील मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) ही अत्यंत नावाजलेली संस्था म्हणून परिचित आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील धनौरा तालुक्यातील २४ दुर्गम भागात एमएमएफ संस्थेने आपले २४ वे ‘पीरियड पॉझिटीव्ह हॉलिडे होम’ पूर्ण करुन महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत सरकारने अतिदुर्गम, मागास आणि नक्षलग्रस्त म्हणून हा भाग घोषित केला आहे. या भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान आवश्यक असलेली स्वच्छता आणि सुरक्षितता मिळावी, या दिवसांत त्यांचा सन्मान व्हावा याकरिता या उपक्रमशील पायाभूत सुविधेची उभारणी करण्यात आली आहे. कोविडच्या काळात हा संवेदनशील उपक्रम सुरु झाला होता. आता हा उपक्रम महिलांच्या आरोग्याप्रती, सन्मानाप्रती आणि स्वावलंबनाकरिता शाश्वत विकासाचे आदर्शउदाहरण बनले आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण व आदिवासी महिलांना मासिक पाळीदरम्यान सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. स्वच्छ सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. पीरियड पॉझिटीव्ह हॉलिडे होममुळे स्थानिक महिलांच्या सहभागातून नेतृत्वगुण आणि सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
गडचिरोलीतील काही दुर्गम भागांमध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून महिला, मुलींना मासिक पाळीच्या दिवसांत झोपड्यांमध्ये राहायला पाठवले जाते. या झोपड्या गावाबाहेर जंगलाच्या टोकाला वसलेल्या आहेत. कुरमा घर नावे या झोपड्या ओळखल्या जातात. महिला व मुलींसाठी कुरमा घरांत राहणे हे अत्यंत असुरक्षित मानले जाते. या अनिष्ट प्रथेमुळे महिलांना केवळ सामाजिक बहिष्कारालाच सामना करावा लागत नाही तर त्यांचे आरोग्यही धोक्यात येते. महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आ वासून उभा राहतो. पाळीच्या दिवसांत महिला, मुलींना आपल्या घरी राहता येत नाही. त्यांना स्वयंपाक, पाणी भरणे किंवा इतर कोणत्याही घरगुती कामास मनाई केली जाते. आपल्या कुटुंबासह गावातील समाजापासून त्या विभक्त राहतात. या दिवसांत गावाबाहेर वसलेल्या असुरक्षित झोपडीत अन्न-पाण्याची व्यवस्था ही गावक-यांकडून पुरवली जाते. अशा घाणेरड्या परिस्थितीत महिलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. शिवाय जंगलातील हिंस्त्र प्राण्यांकडूनही त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती असते. महिला व मुलींना मिळणारी ही वागणून मानवी हक्कांचे उल्लंघन ठरते.
मासिक पाळी ही शिक्षा किंवा समाजातून अलिप्त ठेवण्याचे कारण होऊ नये, या हेतूखातर एमएमएफने या झोपड्यांमध्ये नव्या दृष्टिकोनातून पाहत महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक घराचा आसरा दिला. महिलांसाठी एमएमएफने सुरक्षित घराची स्थापना केली. घराला ‘पीरीयड पॉझिटीव्ह होम्स’ या नावाने ओळखले जाऊ लागले. २०२० साली गडचिरोलीतील तुकूम या गावातून या उपक्रमाची सुरुवात झाली. युवा परिवर्तन या अंमलबजावणी भागीदारीतून हे पहिले पीरियड घर उभारले गेले. या उपक्रमाला बळकटी यावी याकरिता एमएमएफने विस्तारिकरणाचा निर्णय घेतला. याकरिता विविध कॉर्पोरेट संस्था, सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्ती, प्रोजेक्ट नवेली सारख्या स्वयंसेवा संस्थांना सहकार्याचे आवाहन केले गेले. या सहकार्याला फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी प्रमुख देणगीदार म्हणून आजतागायत भक्कम साथ देत आहे. सामाजिक बदल घडवण्यासाठी समान विचारांच्या व्यक्ती तसेच संस्थांसोबत भागीदारी करणे हे बदल घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा एमएमएफचा विश्वास आहे.
या क्रांतिकारी उपक्रमामुळे महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला. अनेक महिलांनी या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्याला मिळालेल्या कलाटणीबाबत माहिती दिली. ब-याचजणींनी समाजाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांच्या मनातील व्यथा मांडली. आम्ही त्या झोपडीत भीतीच्या सावटातच राहायचो, एकांतात दिवस ढकलायचो. आमच्यापैकी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला परंतु तिला मदत करायला कोणीही सरसावले नाहीत. आमचे नातेवाईक आमच्याजवळ येत नव्हते. गावातील पुरुषमंडळी असहाय्यपणे लांबून सर्वकाही पाहत होती. सर्पदंशाने मरण पावलेल्या महिलेला स्पर्श झाल्यास आपण अशुद्ध होऊ, अशी त्यांची समजूत होती.
पूर्वीच्या काळी पाळीची तारीख जवळ आली की, महिलांच्या मनात भीती पसरायची. त्या चिंतेने व्याकुळ व्हायच्या. गावाबाहेरील त्या लहानशा गवताच्या झोपडीत राहण्याच्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा यायचा. झोपडीत पुरेशी हवा नसायची. अंधारलेल्या झोपडीत फारशी जागाही नव्हती. या झोपडीत राहणे असुरक्षित असायचे. मुलभूत सोयीसुविधा नसायच्या. आंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी भरवस्तीपासून दूर जायला लागायचे. सुमारे एक किलोमीटर पायपीट करुन तलाव किंवा नदी गाठावी लागायची. हा मार्गही असुरक्षित असल्याने महिला भीतीच्या छायेत जगायच्या.
नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया म्हणून ओळखल्या जाणा-या मासिक पाळीच्या दिवसांत गडचिरोलीतील दुर्गम भागांतील महिलांच्या वाट्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. भीतीच्या सावटीखाली एकांतकातच त्या या दिवसांचा सामना करत होत्या.
गडचिरोलीतील महिलांना या अमानुष वागणुकीतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी एमएमएफ या संस्थेने अभिनव संकल्पना राबवली. संस्थेने महिलांसाठी सुरक्षित घराची स्थापना केली. याकरिता प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या विटांचा वापर केला. या पर्यावरणपूरक उपाययोजनेमुळे प्लास्टिक कच-याचे व्यवस्थापन झाले. सुरुवातीला ‘सेफ रेस्टिंग होम्स’ म्हणून सुरु झालेला हा उपक्रम कालांतराने ‘पिरियड पॉझिटीव्ह हॉलिडे होम्स’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या परिवर्तनामुळे केवळ भौतिक पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडला. समाज कंटकांच्या मानसिकतेत बदल घडला.
सुरुवातीला ही जागा केवळ साध्या खोलीपुरती बनवली गेली. सुरुवातीला केवळ स्वच्छतागृहापुरती मुलभूत सुविधा उपलब्ध होती. संस्थेने महिलांच्या गरजा जाणून घेतल्या. या चर्चेतून संस्थेने जागेची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाला. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा तसेच सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून वेगवेगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. यात शौचालये, स्नानगृहे, निममित पाण्याचा पुरवठा, सौरउर्जेवर चालणारी प्रकाश व्यवस्था, पंखे, डासांपासून संरक्षण असलेली आरामदायी झोपण्याची व्यवस्था, धूररहित चूल, स्वयंपाकघर, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचाराचे साहित्य, सुरक्षित साठवण व्यवस्था यांचा समावेश आहे.
मासिक पाळीतील आरोग्य हे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ प्रसाधनगृहांसारख्या अत्यावश्यक सोयीसुविधांवर अवलंबून असते. महिलांची गोपनीयता राखली जावी, त्यांना स्वच्छ सोयीसुविधा मिळाव्यात याकरिता सुरक्षित वॉशरूमही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. काळाच्या ओघात ही विश्रामगृहे विसाव्याची ठिकाणे न राहता महिला सक्षमीकरणाची केंद्रे बनली आहेत. महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी शिवणयंत्रणे तसेच इतर मूलभूत प्रशिक्षण व्यवस्थांची सोय उपलब्ध झाली आहे. या महिलांसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून उपजीविकेच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. यामुळे महिलांना स्वावलंबनाचे धडे मिळत आहेत.
या प्रकल्पाच्या उभारणीमुळे स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार मिळाला. स्थानिक गवंडी, रंगकाम करणारे कारागीर, मदतनीसांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. परिणामी, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. संस्थेने टाकाऊ बाटल्या वापरुन विटा बनवण्यासाठी पुढाकार घेतला. स्थानिक पातळीवर बांधकामाशी निगडीत ग्रीन जॉब्स निर्माण झाले. आता गावपातळीवर सॅनिटरी नॅपकिनलाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा जपत असतानाच, या उपक्रमाने स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यात आणि ग्रामीण भागातील कौशल्य विकासाला गती देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धनोर तालुक्यातील पावनी येथे “पीरियड पॉझिटिव्ह हॉलिडे होम्स”चे उद्घाटन केले.
महिलांसाठी पीरियड पॉझिटिव्ह हॉलिडे होम्स उभारून दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवेला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि युवा परिवर्तन यांचे मनःपूर्वक आभार मानले. धनोर तालुक्यातील विविध गावांमध्ये एमएमएफने अशा २४ प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याचे त्यांनी नमूद करत, एमएमएफ आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांचे हे उल्लेखनीय सामाजिक कार्य असल्याचे सांगितले.
महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांवरही भर देत अशा उपक्रमांना भविष्यातही संस्थांकडून सातत्याने पाठिंबा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संसर्ग टाळण्यासाठी गरीब महिलांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कालातंराने या उपक्रमाने विविध माध्यमातून गडचिरोलीत आर्थिक विकासातही मोलाचा वाटा उचलला. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पीरियड पॉझिटीव्ह होलिडे होम्सची चर्चा होऊ लागली आहे. बीबीसी न्यूजनेही या उपक्रमाची दखल घेतली. मासिक पाळीशी संबंधित सामाजिक कलंक दूर करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर पर्यावरणपूरक बांधकामाचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन स्वीकारल्याबद्दल बीबीसी न्यूजने विशेष वृत्त प्रसिद्ध केले. ‘कोन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातही या स्तुत्यप्रिय उपक्रमाची प्रशंसा केली गेली. महिलांच्या नैसर्गिक आणि जैविक प्रक्रियेचा सन्मान करणा-या या व्यासपीठामुळे महिलांची सुरक्षितता, त्यांच्या सक्षमीकरण करणारा संदेश आता देशभरात अधिक प्रभावीपणे रुजला आहे.
पीरीयड पॉझिटीव्ह हॉलिडे होम्सच्या उभारणीमागील हेतूबाबत मुकुल माधव फाऊंडेशनच्या सौ. छाब्रिया यांनी तपशीलवार माहिती दिली. ‘‘पीरियड पॉझिटिव्ह हॉलिडे होम हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित नाही . महिलांना आपल्या मासिक पाळीचे आरामदायी व्यवस्थापन करुन देणारी, त्यांना या दिवसांत आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाचे धडे देणारी जागा आहे. महिलांसाठी ही जागा सुरक्षित आहे. त्यांचा योग्य तो सन्मान आणि जपणूक केली जाते. समाजातील मूळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी समुदाय, भागीदारक संस्था आणि सरकारी यंत्रणांचे एकत्रितकरण व्हायला हवे, असा एमएमएफ संस्थेचा ठाम निर्धार आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन बदल घडू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या आरोग्याच्या केंद्रस्थानी स्वच्छता, काळजी आणि संवेदनशीलता बाळगत हा उपक्रम राबवला जात आहे. या जागेत महिलांचे आरोग्य जपले जाते. त्यांना योग्य सन्मान दिला जातो. महिलांची सुरक्षितताही प्राधान्यक्रम असते’’, असे त्यांनी नमूद केले.
‘‘अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत आणि कठीण काळात स्थानिक समुदायांनी आम्हांला आत्मीयतेने स्विकारले, याकरिता आम्ही त्यांचे मनापासून कृतज्ञ आहोत, या शब्दांत सौ. छाब्रिया यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या विश्वासाने आणि ठाम पाठिंब्यामुळे आमचा पक्का निर्धार झाला. आम्हांला ही सामाजिक वाटचाल समर्पकपणे आणि संवेदनशीलपणे पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळाली. स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य हेच या उपक्रमाच्या यशामागील खरे बळ असून, त्यांच्या विश्वासामुळेच आम्हांला समाजहितासाठी सातत्यपूर्वक निष्ठेने काम करता येते’’, असेही त्यांनी सांगितले.
सर्च फाऊंडेशनच्या सहसंस्थापिका डॉ. राणी बाग यांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, ‘‘आदिवासी भागांमध्ये मासिक पाळीविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून घरे उभारली जातात. या उपक्रमाचे नेटाने नेतृत्व करणा-या मुकुल माधव फाऊंडेशनचे मी मनापासून कौतुक करते. घरांच्या रचनेत सन्मान, गोपनीयता आणि मासिक पाळीच्या काळातील आरोग्याच्या सोयीसुविधा यांचा विचार केला आहे. महिलांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. हा उपक्रम केवळ बांधकामाशी निगडीत नसून, महिलांच्या सन्मान आणि आरोग्याचे संरक्षण करण्याची संस्थेची बांधिलकी दर्शवते. मी प्रामाणिकपणे संस्थेचे अभिनंदन करते.’’
‘‘आम्ही युवा प्रतिष्ठानमध्ये फिलोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकूल माधव फाऊंडेशन यांच्यासोबतच्या भागीदारीला फार महत्त्व देतो. या दोन्ही संस्थांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाप्रती आम्ही आभारी आहोत. एका छोट्या उपक्रमातून सुरु झालेली ही चळवळ आज मासिक पाळीदरम्यान महिलांना आणि मुलींना सन्मान, सुरक्षितता आणि आत्मविश्वास परत देण्याच्या क्रांतिकारी अभियानात रुपांतरित झाली आहे. समुदायांच्या गरजा समजून घेणे, पायाभूत सुविधांमध्ये विचारपूर्वक सुधारणा करणे तसेच शाश्वतता आणि उपजीवीकेच्या संधींचा समावेश करणे हा एमएमएफच्या कटिबद्धतेमुळे शक्य झाले आहे. पीरीयड पॉझिटिव्ह हॉलिडे होम्स आता केवळ निवा-याची ठिकाणे न राहता काळजी, शिक्षण आणि सक्षमीकरणाची केंद्रे बनली आहेत. संस्थेने गडचिरोलीतील समुदायांना सोबत घेतले. समाजाला महिलांच्या मासिक पाळीतील दिवसांत त्यांना सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलनेते पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. या प्रवासात संस्था आमच्यासोबत राहिल्याने आम्ही एमएमएफचे मनापासून आभार व्यक्त करतो,’’ असे दर्शन सावंत म्हणाले.
“महिलांचे सशक्तीकरण हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी टप्पा आहे — तो विचारसरणी बदलतो, भविष्याची नव्याने जडणघडण करतो आणि आपल्या समाजातील अमर्याद क्षमता खुली करतो. आपण जेव्हा महिलांमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा आपण शाश्वत प्रगतीत गुंतवणूक करत असतो,” असे संदीप पाटील, आयपीएस, पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी), नागपूर परिक्षेत्र यांनी सांगितले.
गडचिरोलीतील अभिनव उपक्रमाबाबत एमएमएफ संस्थेनेही पुन्हा आपली भूमिका ठामपणे जाहीर केली. महिलांच्या मासिक पाळी काळात त्यांच्याकडे हीनभावनेने पाहू नका. महिलांचा बहिष्कार करु नका. या दिवसांत त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याप्रती संवेदनशीलता आणि सन्मानपूर्ण वागणूक असायला हवी. महिलांना आरोग्यदायी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक असे सुरक्षित आणि सन्मानपूर्व आणि सशक्त वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था सातत्यपूर्ण कार्यरत राहील, असे संस्थेने स्पष्ट केले. मासिक पाळी हा लज्जेचा विषय नाही. या विषयाला वगळता कामा नये. ही नैसर्गिक बाब असून, सन्मानपूर्वक स्विकारायला हवी, असा संस्थेने ठाम संदेशही दिला. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न उत्तरोत्तर अधिक बळकट होत राहतील, असा निर्धारही व्यक्त केला.


