पुणे, दि. २० मार्च (जिमाका वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री कै.अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक दि. २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या जनरल निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेतला.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून निवडणुकीची पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक (FST) व स्थिर देखरेख पथक (SST) यांचे नियोजन, तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी या विविध बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या.
भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. जनरल निरीक्षक श्री. सुनिल कुमार वर्मा (IAS) – ७६६६६३९८५९, खर्च निरीक्षक श्री. बनोथ अखिल राम नाईक (IRS) – ७६६६६२८९८६ आणि पोलीस निवडणूक निरीक्षक श्री. एन. कोलंची (IPS) – ९५७९२३८७३०. हे तिन्ही निरीक्षक बारामती येथील विश्रामगृहात मुक्कामी आहेत.
बारामती विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी किंवा सूचना असल्यास संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांनी केले आहे.


