Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमी मराठी' मधून महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कारांचे दर्शन*  नंदेश उमप आणि...

मी मराठी’ मधून महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कारांचे दर्शन*  नंदेश उमप आणि ७५ कलाकारांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४३ वा वर्धापनपदिनानिमित्त संगीत महोत्सव  

 

 

पुणे : वासुदेव, जागरण गोंधळ, जात्यावरची गाणी, धनगर गीत, कोळी गीत अशी मराठमोळी संस्कृती नृत्य, नाट्य आणि गायनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर उलगडली. सह्याद्रीच्या कडेकपारी… या देशाची अमृतवाणी…मी मराठी, शिवरायांची दिव्य आठवण… तुमचे अमुचे एक जागरण… मी मराठी असे सांगत नंदेश उमप यांच्यासह ७५ कलाकारांनी सादरीकरण केले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्स तर्फे नंदेश वत्सला विठ्ठल उमप प्रस्तुत ‘मी मराठी’ कार्यक्रमात नंदेश उमप आणि ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. यापूर्वी पं.उपेंद्र भट आणि सहका-यांचा गुरु गणेश हा सांगीतिक कार्यक्रम देखील झाला.

 

निराकार ओंकार निर्गुण रूप… या गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. संत, साहित्यिक आणि कवींच्या कविता सादर करीत मराठी भाषेचे जागरण यानिमित्ताने करण्यात आले. हृदयस्पर्शी अभंग, शेतकरी गीतांप्रमाणेच पोतराजाने केलेली जनजागृती आजच्या पिढीला सांगण्याकरिता झालेले सादरीकरण उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. होळी, रंगपंचमी सारख्या सणांची माहिती आणि महती देखील कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांसमोर ठेवली.

 

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, शनिवार, दि. २१ मार्च रोजी खंडेराव मुळे आणि सहका-यांचा स्वरायात्रा हा कार्यक्रम सादर होईल. तर, दुस-या सत्रात कुणाला गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट चा आनंद पुणेकरांना घेता येईल. रविवार, दि. २२ मार्च रोजी नटरंग अ‍ॅकॅडमी तर्फे त्रिपुंड हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर माणिक वर्मा फाऊंडेशन निर्मित अमृताहुनी गोड हा कार्यक्रम पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.

 

महोत्सवाची सांगता सोमवार, दि. २३ मार्च रोजी पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने आणि दुस-या सत्रात पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम या स्वरमैफलीने होणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments