भक्ती आणि स्वामींची शक्ती यांची जोड आयुष्याला लाभली की जीवनात प्रत्यय येतो आणि आयुष्य सोप्पे होते. त्यासाठी स्वामींच्या ‘तारक मंत्र’चा जप श्रद्धेने करा, स्वामींचे आशीर्वाद प्रत्येकाला मिळत राहतील असे प्रतिपादन ह.भ.पं सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी केले. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने सोनाली अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे, येथे ‘स्वामी समर्थ भक्तीमहात्म्य’ या विषयावर सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी त्या बोलत होत्या . भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते स्वामींची आरती झाली. याप्रसंगी भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
कीर्तनकार सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी कीर्तनात, ‘प्रथम जाणे भक्तीचा जिव्हाळा’ हा पूर्वरंग आणि स्वामी समर्थ कथा आणि त्या नंतर दामाजी पंत अख्यान म्हणजे उत्तररंग सादर करून सर्व उपस्थितांची, भक्तांची मने जिंकली.
याप्रसंगी तबला साथ प्रसिद्ध तबला वादक पंडित विजय दास्ताने यांचे शिष्य जयराज हुंडेकरी यांची लाभली तर हार्मोनियम साथ साहील पुंडलिक यांची लाभली. यावेळी स्वाती वाळके, मनीषा जोशी, नेहा काळे तुंगे, क्षमा शेनितकर, अजय मोरे, अनिकेत कुलकर्णी, सुहास रसाने, स्वप्नील रसाने यांनी प्रकट दिनाची तयारी केली होती. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


