Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुढीपाडवा-पट वाढवा अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*

गुढीपाडवा-पट वाढवा अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*

 

 

पुणे, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गरदरेवाडी (वडगाव बांडे) येथे आयोजित ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ राज्यस्तरीय अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी आमदार राहूल कुल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, माजी आमदार रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, उपसंचालक गणपत मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

श्री. भुसे म्हणाले, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण जसे नवीन वर्षाचे स्वागत करतो, त्याचप्रमाणे ‘पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व शासकीय शाळा गजबजून जाव्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधत ‘शाळा प्रवेशोत्सव’ सणाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. शासकीय शाळांमधील शिक्षकांची गुणवत्ता व अनुभव उच्च दर्जाचा असून डिजिटल शिक्षण, प्रगत साधने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धेत टिकू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सरपंच, ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, तसेच एकही मूल शाळेबाहेर राहू नये आणि शाळांची पटसंख्या दुपटीने वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.

 

श्री. कुल म्हणाले, आदर्श शाळा, स्मार्ट शाळा व्हायात म्हणून शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे प्रयत्न आहेत. आता शाळा सुधारण्यासाठी अनेक कंपन्या आपला सीएसआर देण्यासाठी पुढे येत आहेत. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गरदरेवाडीच्या गावकऱ्यांचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक. इथे शिक्षणाबरोबर खेळ, ध्यान धारण, आहार याबाबतीत या सगळ्या गोष्टीवर विशेष लक्ष दिलं जात आहे.

 

श्री. जगदाळे म्हणाले, पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडत असून जिल्हा परिषदेच्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी ५६ कोटी रुपये शिक्षणासाठी राखीव आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन समन्वयाने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इस्त्रो व नासा विद्यार्थी भेट, ३०३ मॉडेल स्कूल, विज्ञान प्रदर्शन, बालकुमार साहित्य संमेलन यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या काळात २५ विद्यार्थ्यांना नासा तसेच २५ विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस एजन्सीकडे पाठविण्याचे नियोजन आहे. याशिवाय आंतरराज्य विद्यार्थी दौरे, बाल संसद, शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा, ६०० शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांना विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेला जागा देणाऱ्या लक्ष्मण गरदरे यांचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच इनोबल फाउंडेशनने सीएसआरच्या माध्यमातून या शाळेसाठी मदत केल्याबद्दल चिराग भंडारी, नरेश शहा यांचाही गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments