Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी*_  *आंतरराष्ट्रीय...

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी*_  *आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 

 

*राज्यात क्रीडा स्पेशालिस्ट शाळांचा निर्णय – शिक्षण मंत्री दादाजी भुसे*

 

पुणे, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी, वाघोली (पुणे) येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्पर्धेतील मोठ्या सहभागाचे कौतुक करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत ४० लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याचे नमूद केले. राज्यातील कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आणि ६८ वा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केला. त्यांना शिक्षण मंत्री दादाजी भुसे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख ५ लाख रुपये आणि फॉर्च्युनर चारचाकी गाडीची चावी प्रदान करण्यात आली.

 

या स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी उपविजेतेपद पटकावले. त्यांना रोख ४ लाख रुपये तसेच स्कॉर्पिओ गाडीची चावी देऊन सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजयकुमार, महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस, संयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्यासह कुस्ती संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा स्पेशालिस्ट शाळा सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

 

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुस्ती क्षेत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची आठवण करून दिली. भविष्यात कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments