पुणे, ११ मार्च २०२४ : ब्लॉकबस्टर ‘मगधीरा’सह विविध दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी आणि सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अष्टपैलू अभिनेते देव गिल यांच्या नेतृत्वाखालील देव गिल प्रॉडक्शनने आज त्यांच्या ‘अहो! विक्रमार्का’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लुकचे अनावरण केले. पिंपरी चिंचवडमधील डांगे रोड येथे भव्य समारंभात मोठ्या उत्साहात पार पडला. ‘अहो! विक्रमार्का’ उत्कंठावर्धक कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांसह देशभरातील प्रेक्षकांना उत्कृष्ट मनोरंजन करण्याचे वचन हा चित्रपट देतो.
या चित्रपटाची कथा पोलीस दलाचे शौर्य आणि बलिदान यावर केंद्रित आहे, त्यामुळे या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलिस श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारगृह व सुधारसेवा पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे, श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड, श्रीमती. तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार पुणे, श्री. महादेव जगताप, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
अभिनेते आणि निर्माता तसेच मगधीरा फेम देव गिल यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले, ‘अहो! विक्रमार्का’ या चित्रपटाद्वारे महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि समर्पण प्रभावी पद्धतीने लोकांसमोर आणण्याचे आमचे ध्येय आहे.
आरआरआर, बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली २ द कन्क्लूजन अशा गाजलेल्या भव्य चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेले पेटा त्रिकोटी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ते म्हणाले, ‘अहो! विक्रमार्का’ चित्रपटातून, आम्ही शौर्य आणि बलिदानाची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. भाषा आणि संस्कृतींवरही यात भर देण्यात आला आहे.
‘अहो! विक्रमार्का’ चित्रपटात प्रेम, अॅक्शन आणि भावनिकता यांचे अप्रतिम मिश्रण दिसून येईल. यात देव गिल, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित, चित्रा शुक्ला, प्रभाकर, विक्रम शर्मा आणि बिथिरी सत्ती असे तगडे कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे देव गिल प्रॉडक्शनने या चित्रपटसृष्टीतील आपला नवा प्रवास सुरू केला आहे. या प्रॉडक्शन हाउसद्वारे प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम चित्रपटांची भेट मिळेल, असा विश्वास देव गिल प्रॉडक्शनने व्यक्त केला आहे.


