Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी उपयुक्त 'बिल्ट एनव्हायरमेंट' अभ्यासक्रम सुरू

बीएनसीएमध्ये बांधकाम क्षेत्रासाठी उपयुक्त ‘बिल्ट एनव्हायरमेंट’ अभ्यासक्रम सुरू

पुणे, दि. २५ मार्च २०२६ : उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) बिल्ट एनव्हायरमेंट (बांधकाम पर्यावरण) यावरील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम याच वर्षात सुरू होत आहे. हा अभ्यासक्रमाचे नियोजन आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एसा), पुणे सिव्हील इंजिनियरिंग रिसर्च फौंडेशन (पीसीईआरएफ) आणि रोहन बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

त्याची सुरुवात या संदर्भातील सामंजस्य करार ‘एसा’च्या ५५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात करण्यात आली. त्यावेळी बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्यासह ‘एसा’चे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे, चेअरमन अर्किटेक्ट महेश बांगड, सेक्रेटरी निनाद जोग, तसेच जयदीप राजे, इंजिनियर जयंत इनामदार, रोहन बिल्डर्सचे अभिषेक भटेवरा, पीसीईआरएफचे मानस सचिव आर्किटेक्ट शिरीष केंभवी, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अर्किटेक्ट विलास अवचट, या अभ्यासक्रम उपक्रमाच्या संचालक डॉ. वैशाली अनगळ आणि समन्वयक अर्किटेक्ट पूजा घोरपडे हे मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने झालेल्या शुभारंभ सोहळ्यात बांधकाम क्षेत्रातील सुमारे ३०० बहुशाखीय व्यवसायिकांनी हजेरी लावली.

 

सामंजस्य कराराबाबत बोलताना डॉ. कश्यप म्हणाले की, बीएनसीएच्या प्रवासातील हा एक नवीन टप्पा असून नवोन्मेष, सहकार्य आणि बांधकाम उद्योगाशी निगडीत शिक्षणाबाबतची आमची बांधिलकी अधोरेखित करतो. ‘बिल्ट एनव्हायरमेंट’ वरील हा अभ्यासक्रम उद्योगाभिमूख असून त्यासाठी लागणारे व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्ये यावर भर देणारा आहे.

 

हा अभ्यासक्रम म्हणजे ‘एसा’च्या आजवरच्या वाटचालीतील एक मोठा पल्ला गाठणारा ठरेल, असा विश्वास अध्यक्ष राजे यांनी व्यक्त केला. येत्या एक जुलैपासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून प्रत्यक्ष अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

 

अधिक माहिती देताना या उपक्रमाच्या संचालक डॉ. अनगळ यांनी सांगितले की, इंग्लंडमधील जॉन मूअर्स युनिव्हर्सिटी आणि तेथील आघाडीच्या उद्योग भागिदारांच्या सहकार्यातून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये आर्किटेक्ट्स, सिव्हील इंजिनियर्स तसेच अनुनभवी आणि अनुभवी व्यावसायिकही सहभागी होऊ शकतील. यामध्ये कामावर आधारित प्रशिक्षण, प्रत्यक्ष कार्यानुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने तो या क्षेत्रासाठी उपयुक्त

ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments