Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजरा* श्री रामजी...

पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजरा* श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने आयोजन ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

 

पुणे : कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे… असे पाळण्याचे मंगल स्वर पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले. मंदिरात श्रीराम जन्म सोहळ्यात झालेली फुलांची उधळण…रांगोळीच्या पायघड्या आणि गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पाळणा हलताच श्रीराम नामाच्या झालेल्या एकत्रित जयघोष वातावरण राममय झाले.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग राममंदिरात श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदा २६५ वे वर्ष आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा विविध क्षेत्रातील मान्यवर मंदिरात दर्शनासाठी आले होते.

 

श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा झाला. श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा ‘पागोट्याचा प्रसाद’ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर, सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात पुणेकरांकडून पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

 

डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये फुलांनी सजवलेल्या सभामंडपात २६५ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा करण्यात आला. याशिवाय उत्सवात शनिवार, दि.२८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्रीरामराज्याभिषेक सोहळा होणार आहे. यामध्ये ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि सर्व तुळशीबागवाले कुटुंबीय यांजकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments