पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे यांच्या वतीने अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ लॉ आणि जाधवर कॉलेज ऑफ लॉ यांच्या सहकार्याने २ री राष्ट्रीय स्तरावरील जाधवर मूट कोर्ट स्पर्धा २०२६ चा समारोप समारंभ रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल नऱ्हे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन आणि कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम नागनाथराव रुकमे यांचीही प्रमुख असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, ऍड. सुधाकर आव्हाड, ऍड. एस.के.जैन देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुणे व अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधीश देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेस देशभरातील विधी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध विधी महाविद्यालयांमधून एकूण २८ संघ सहभागी झाले आहेत. हे संघ समकालीन कायदेशीर विषयांवर युक्तिवाद सादर करत आपली वकिली व संशोधन कौशल्ये सादर करणार आहेत. ही स्पर्धा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपाध्यक्ष अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या संयोजक म्हणून जाधवर कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्या डॉ. सपना देव कार्यरत आहेत. मूट कोर्ट स्पर्धेमुळे विधी विद्यार्थ्यांना कायदेशीर संशोधन, मसुदा लेखन आणि न्यायालयीन वकिली कौशल्य विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असून, शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष न्यायालयीन अनुभव यांमधील दरी कमी करण्यास मदत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.


