Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकन्नड संघाच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन ...

कन्नड संघाच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन कलमाडी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा केला यथोचित सन्मान

 

पुणे, दि. २८ मार्च, २०२६ : कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कुलमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेले क्रीडा मैदान आणि सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. उद्घाटन समारंभाला सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्ष इंदिरा सालियन, डॉ. नारायण हेगडे, अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय आणि पायल कलमाडी- भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुण्यात रोजगाराच्या शोधात स्थायिक झालेल्या कन्नड कुटुंबातील मुलांना आपल्या मातृभाषेत शालेय शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरेश कलमाडी यांचे वडील डॉ. शामराव कलमाडी यांनी कन्नड संघाची स्थापना केली होती. तर क्रीडा क्षेत्रात पुणे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी सुरेश कलमाडी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, महाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीची निर्मिती आणि पुण्याला २००८ साली मिळालेले कॉमनवेल्थ युथ गेम्सचे यजमानपद आदींचा समावेश आहे. त्यांच्या याच योगदानाचा सन्मान करण्यासाठी कन्नड संघाच्या गणेश नगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सुरेश कलमाडी स्पोर्ट्स सेंटर सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत दोन अत्याधुनिक बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहेत. डॉ. कलमाडी शामराव शाळेतील या क्रीडा मैदानाचा विकास करण्यासाठी अद्विक फाउंडेशनकडून ६५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

 

यावेळी बोलताना मीरा कलमाडी म्हणाल्या की, “केंद्रीय मंत्री व पुण्याचे खासदार राहिलेले सुरेश कलमाडी यांचे खेळावर खूप प्रेम होते. पुण्यात पहिल्यांदा त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा सुरु केली. तेव्हा त्यामध्ये ३०० जणांनी सहभाग नोंदवला होता. कालांतराने स्पर्धेचा लौकिक वाढत गेला आणि खेळाडूंची संख्या तीन लाखांपर्यंत जाऊन पोहोचली.” मुलांनी खेळामध्ये सहभाग घेऊन देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहन देखील मीरा कलमाडी यांनी यावेळी केले.

 

आपल्या भाषणात मालती कलमाडी म्हणाल्या, “मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा उद्देश असून खेळाच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. या ठिकाणी उभारण्यात आलेली ही सुविधा हा पायलट प्रोजेक्ट आहे. कालांतराने त्याचा विस्तार संस्थेच्या अन्य शाळांमध्ये करण्यात येणार आहे. मुलांमध्ये असणाऱ्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने तिसऱ्या इयत्तेपासून मुलांची क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा ओळखण्यासाठी एक मॉड्यूल विकसित केले आहे. कावेरी महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर, क्रीडा प्राध्यापक डॉ. रोहित तांबे यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे.” संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक वैयक्तिक खेळ आणि एक कला प्रकार अनिवार्य आहे. विद्यार्थी वर्गाला त्याचा चांगला फायदा होत असल्याचेही मालती कलमाडी यांनी नमूद केले.

 

भारतामध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्यामध्ये सुरेश कलमाडी यांचे योगदान मोठे राहिलेले आहे. खेळामुळे करियरला आकार येण्यास मदत होते, खेळामध्ये वेगळी ताकद असल्याचे अद्विक फाउंडेशनचे आदित्य भारतीय यांनी स्पष्ट केले. सुरेश कलमाडी यांचे खेळावर विशेष प्रेम होते. या क्रीडा केंद्रामध्ये एक वेगळ्या प्रकरची ऊर्जा असल्याचे डॉ. नारायण हेगडे यांनी सांगितले.

 

इथे मुलांची शारीरिक क्षमता तपासून त्यांची खेळासाठी निवड करण्यात येते. त्यामुळे त्यामधील क्रीडा गुणांचा विकास करणे सहजशक्य होत असल्याचे क्रीडा प्राध्यापक डॉ. रोहित तांबे यांनी नमूद केले. सुमती श्रीनिवासन यांनी आभार मानले. पूजा आंबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचा

लन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments