पिंपरी दि. ११ मार्च २०२४ :- ‘’आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’, अशी मतदार शपथ जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, पदाधिकारी अभिमान भोसले, महादेव बोत्रे तसेच महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, आंतराष्ट्रीय महिला दिनाची सुरूवात एका कामगार आंदोलनातून झाली होती. १५ हजारपेक्षा जास्त महिलांनी रस्त्यावर उतरून न्युयॉर्कमध्ये मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
वर्षातील प्रत्येक दिवस हा महिलेचाच असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक महिलेचा दिवस असतो. पुरूषाप्रमाणे महिलेच्याही खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते. सकाळी उठल्यापासून जेवणाचा डबा करण्यापासून ते रात्री मुलाबाळांना झोपवण्यापर्यंत संपुर्ण घर महिला सांभाळत असते. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज सर्वतोपरी कार्ये करु शकते कारण आजची महिला सक्षम आहे. ती देश चालवू शकते, विमान चालवू शकते, रिक्षा चालवू शकते, उद्योजक बनू शकते, अधिकारी बनू शकते, राजकारणात उतरू शकते अशी सगळ्या प्रकारची कामे महिला अगदी जबाबदारीने पार पाडू शकते, असे मत आमदार खापरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अवयव प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांचे व्याख्यान पार पडले. या व्याख्यानात त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अवयव प्रत्यारोपणबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच देहदान आणि अवयवदान यातील फरक उपस्थितांना समजावून सांगितला. मृत्यु मृत्युच्या कारणांवरुन अवयवदानाची आणि देहदानाची पात्रता ठरवता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले. याव्यतिरिक्त अवयवदान कोणकोणत्या अवस्थेत करता येते, कोणकोणते अवयव दान करता येतात, अवयवदानाचे प्रमाणपत्र कोठे मिळते, दान देण्यात आलेल्या अवयवांचे वितरण कसे करता येते अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन आरती गोखले यांनी यावेळी केले.
डॉ. प्रीतम चोपडे यांनी टॉयलेट सेवा ऍपची माहिती देताना ‘’प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत महिला, समस्या सोडविण्यास तुमची टॉयलेट सेवा ऍप आहे का तुम्ही पाहिला, प्रश्न तुमचे कसे सुटतील जर तो डाऊनलोड करायचा राहिला, नोंदवा तुमची मते आणि तक्रारी, कारण आम्ही तो तुमच्यासाठीच वाहिला’’ ही कविता सादर करून टॉयलेट सेवा ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहनही केले.
जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी चारूशीला जोशी, अनिता बावीसकर, कविता माने, मिनाक्षी गरूड, मनाली स्वामी, विजया कांबळे, शीतल मोरे, प्रियंका कोंढाळकर, सीमा सुकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले, त्यांचा आमदार उमा खापरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी गीतगायन तसेच विविध पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी यांनी तर उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले.


