पुणे,31 मार्च 2026 : नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल पीपल (एनसीपीईडीपी) तर्फे दिव्यांगांचे हक्क अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी डिसेबिलिटी रिर्पोटिंग वर मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.याबाबत माजी पत्रकार व एनसीपीईडीपीचे सल्लागार डॉ.नवनीत आनंद व एनसीपीईडीपी चे उपक्रम व्यवस्थापक विनित बी. यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्याच्या अमंलबजावणीवरील एक पायाभूत अभ्यासातील अलीकडील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर अधिक सहभागाचे आवाहन करण्यात आले.या अभ्यासात असे दिसून आले आहे की,केवळ 26 टक्के दिव्यांग व्यक्ती रोजगारात आहेत,तर 56 टक्के व्यक्तींना कायद्याबाबत माहिती नाही.केवळ 6 टक्के लोकांना सार्वजनिक वाहतूक सुलभ वाटते आणि जवळपास 50 टक्के लोकांना नियमित आरोग्यसेवा मिळत नाहीत.या निकषांवरून हे स्पष्ट होते की,धोरणात्मक हेतू जरी प्रबळ असला तरी चांगले परिणाम साधण्यासाठी अधिक जागरूकता आणि सक्रीय सहभागाची आवश्यकता आहे.


