पुणे, दि. १० ऑक्टोबर : महापुरुषांची बदनामी, अवहेलना थांबवण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करायला हवे, अशी आग्रही मागणी गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी आज येथे केली. समर्थभक्त ज्येष्ठ पत्रकार स्व. मधू नेने यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययन आणि श्री समर्थ मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती, त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. चारुदत्त आफळे, सुहास क्षीरसागर व विनायक वझे उपस्थित होते.
यावेळी दातार पुढे म्हणाले की, आज सर्वच जाती-धर्मातील महापुरुषांची सर्रास बदनामी, टिंगल टवाळी केली जाते, हे थांबवायला हवे. घटनात्मक आणि सर्वोंच्च पदांवरील व्यक्तींची तसेच संत-महंत आणि श्रध्दास्थानांची देखील बदनामी केली जाते, हे थांबवण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे. समर्थभक्त मधू नेने यांनी सज्जनगड मासिक पत्रिकेच्या माध्यमातून यासाठी अनेकदा लिखाण केले होते. असे कायदे झाल्यास तीच मधू नेने यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
पत्रकारिता, सहकार, संघटक असलेल्या मधू नेनेंचे बहुआयामी व्यक्तिमत्व प्रेरणादायी होते, अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या तर त्यांच्या आठवणींना उजाळा देतांना सर्वश्री रमण चितळे, मंजिरी धुपकर, भालचंद्र कुलकर्णी, विरेंद्र ताटके, अविनाश हळबे, स्वाती देशपांडे, दिवाकर देशपांडे, विक्रम केळकर, दीपा भंडारे, कल्पना ताडे आदिंनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सुहास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. समर्थभक्त दीपा भंडारे यांनी सादर केलेल्या ‘कल्याण करी’ या प्रार्थनेने शोकसभेची सांगता झाली.
———


