Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुटुंब व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा धनकवडीत 'विराट हिंदू संमेलन' उत्साहात;...

कुटुंब व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा धनकवडीत ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात; ८४ वर्षीय महाजन काकूंचे नृत्य आकर्षणाचे केंद्र

धनकवडी, ता. ३० : “सध्या समाजात ‘डबल इन्कम नो चाईल्ड’ सारखे जे ट्रेंड्स येत आहेत, ते आपल्या संस्कृतीसाठी घातक आहेत. भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आपली कुटुंब व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था टिकवून ठेवणे हे स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे. जी पतीचे पतन रोखते आणि कुटुंबाचा एकोपा राखणे हाच आपला धर्म मानते, तिलाच ‘धर्मपत्नी’ म्हटले जाते,” असे प्रतिपादन मातृशक्ती वक्त्या लीनाताई पुराणिक यांनी केले.

धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटी परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ प्रसंगी त्या बोलत होत्या. या संमेलनाला परिसरातील ६ उपवस्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे ४५५ नागरिक व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर प्रमुख वक्ते रवींद्र वंजारवाडकर, ह.भ.प. संदीप गोगावले महाराज, संयोजक नंदकुमार घाटे, सह-संयोजक नंदकुमार ताठवडेकर आणि सुरेश लाळे उपस्थित होते.

प्रमुख वक्ते रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून ९० हजार शाखांच्या माध्यमातून अव्याहतपणे चारित्र्य निर्माणाचे काम करत आहे. राममंदिर उभारणी असो किंवा कोरोनासारखी वैश्विक आपत्ती, स्वयंसेवकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समाजहित जपले आहे. आपण स्वतःचे चारित्र्य घडवले, तर राष्ट्राचे भविष्य आपोआप उज्ज्वल होईल.”

ह.भ.प. संदीप गोगावले महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर आज आपल्याला हिंदू धर्म कळला नसता. त्यामुळे आपल्या महान संस्कृतीचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे काम आहे. प्रत्येकाच्या घरात ‘भगवद्गीता’ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असायलाच हवा.” भारतमाता आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनावेळी झालेल्या शंखनादाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्यातील भावनिक संवाद उपस्थितांना भारावून टाकणारा ठरला. ८४ वर्षीय महाजन काकू यांनी सादर केलेले ‘गणेश वंदना’ नृत्य या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाटील व सई कुलकर्णी यांनी केले, तर सुरेश लाळे यांनी आभार मानले. भारतमातेची आरती आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या यशस्वी आयोजनासाठी ६ विविध संस्था आणि २२ कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments