कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आता अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान-आधारित ‘बॉर्डरलेस हेल्थकेअर’ (सीमाविरहित आरोग्यसेवा) मधील एक जागतिक केंद्र बनले आहे. यामुळे भारतीय डॉक्टरांना सातासमुद्रापार आपली तज्ञता आणि अचूक उपचार पोहोचवण्याची एक नवी शक्ती मिळाली आहे.
मुंबई, 9 एप्रिल 2026: यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त — “आरोग्यासाठी एकजूट, विज्ञानाशी एकनिष्ठ” हा संकल्प अधोरेखित करत, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने जागतिक आरोग्य सेवेच्या क्षितिजावर एक नवा इतिहास रचला आहे. विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक अद्भूत आविष्कार घडवत, डॉ. टी. बी. युवराजा यांनी चक्क मुंबईतून ‘रिमोट’ पद्धतीने ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये एका ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी ‘रोबोटिक रॅडिकल नेफ्रेक्टोमी’ (किडनी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया पार पाडली. अत्यंत प्रगत अशा ‘मेडबॉट तौमाई (Toumai) रोबोटिक सर्जरी सिस्टम’ द्वारे केलेली ही शस्त्रक्रिया भारतातील पहिली ‘क्रॉस-बॉर्डर रिमोट रोबोटिक सर्जरी’ ठरली आहे. ही केवळ एक वैद्यकीय कामगिरी नसून, अशा भविष्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे जिथे भारतीय डॉक्टरांचे कौशल्य भौगोलिक सीमांची बंधने ओलांडून जगभरातील रुग्णांना वेळेत आणि अचूक उपचार मिळवून देईल.
अत्याधुनिक रोबोटिक यंत्रणा आणि अखंडित ‘रिअल-टाइम’ कनेक्टिव्हिटीच्या बळावर, ही शस्त्रक्रिया कमालीच्या अचूकतेने आणि पूर्ण नियंत्रणासह यशस्वीरित्या पार पडली. या ऐतिहासिक कामगिरीने जागतिक स्तरावर ‘क्रॉस-बॉर्डर रिमोट सर्जरी’ची विश्वासार्हता आणि वैद्यकीय सक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. रुग्णालयातील भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि सक्षम पायाभूत सुविधांमुळेच हे क्रांतिकारी यश साध्य झाले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे भारतातील रोबोटिक सर्जरीचे प्रमुख केंद्र असून, देशातील पहिली ‘मेडबॉट तौमाई रोबोटिक सर्जरी सिस्टम’ येथेच कार्यरत आहे. तीन अत्याधुनिक रोबोटिक प्लॅटफॉर्म्सनी सज्ज असलेले हे हॉस्पिटल, ‘मल्टी-डिसिप्लिनरी’ रोबोटिक सर्जरीच्या क्षेत्रात देशातील क्रमांक १ चे खाजगी वैद्यकीय केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल्सच्या यूरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी (ग्रुप) विभागाचे संचालक, डॉ. टी. बी. युवराजा — ज्यांच्या गाठीशी ४२०० हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रमी अनुभव आहे — यांनी या ऐतिहासिक यशावर आपले विचार मांडले: “आज आपण जागतिक आरोग्य सेवेच्या वितरणामधील एका क्रांतिकारी युगाचा उदय पाहत आहोत. सातासमुद्रापार ‘रिअल-टाइम’मध्ये शस्त्रक्रिया करणे आता शक्य झाल्यामुळे, सर्वोत्तम वैद्यकीय नैपुण्ये आणि ज्ञान आता भौगोलिक सीमांमध्ये बंदिस्त राहिलेले नाही. हा महत्त्वाचा टप्पा केवळ एक यशस्वी शस्त्रक्रिया नसून, भविष्यातील आरोग्य सेवा कशा प्रकारे भौतिक सीमा ओलांडत आहेत, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. जसजसे तंत्रज्ञान आपल्याला जगभरात कुठेही अचूक उपचार पोहोचवण्यास सक्षम करत आहे, तसतसा भारत या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत आहे. आपण केवळ उपचारांसाठीचे एक डेस्टिनेशन नाही आहोत, तर जागतिक स्तरावर ‘रिअल-टाइम’ वैद्यकीय नैपुण्ये आणि ज्ञान पुरवणारे एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून उदयास येत आहोत.”
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ, डॉ. संतोष शेट्टी यांनी सांगितले: “हे यश म्हणजे रुग्णालयाचे तांत्रिक नेतृत्व आणि ‘रिमोट रोबोटिक सर्जरी’मधील आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीचाच पुढचा अध्याय आहे. यामुळे वैद्यकीय नवोपक्रमाच्या क्षेत्रातील आमचे अग्रस्थान अधिकच अधोरेखित झाले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि डॉ. युवराजा आधुनिक ‘टेलीसर्जरी’च्या मर्यादा ओलांडून नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत—यावेळी भारताच्या प्रगत क्लिनिकल सामर्थ्याचा लाभ मस्कतच्या एका कॅन्सर रुग्णाला मिळवून देण्यात आला आहे.
आज जगभरातील आरोग्य व्यवस्था नैपुण्ये आणि सुलभता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी, ही कामगिरी एका मोठ्या क्रांतीची नांदी आहे—असे भविष्य जिथे भौगोलिक अंतराचे अडथळे कायमचे मिटतील, उपचार प्रत्येकाच्या आवाक्यात असतील आणि जागतिक आरोग्य सेवेचे भविष्य घडवण्यात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल.”
ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) च्या मार्गदर्शक तत्त्वांसह सर्व नियामक चौकटींचे काटेकोर पालन करून पार पडली. यामध्ये सुरक्षितता, नीतिमत्ता आणि ‘क्लिनिकल गव्हर्नन्स’च्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्यावर विशेष भर देण्यात आला. ‘मेडबॉट तौमाई रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टम’च्या साहाय्याने केलेली ही ‘रॅडिकल नेफ्रेक्टोमी’, भारतातील सीमापार वैद्यकीय सेवांच्या क्षेत्रातील एक सुवर्णक्षण आहे. नियम आणि मानकांचे हे तंतोतंत पालन अत्यंत मोलाचे आहे, कारण रिमोट सर्जरी आता केवळ एक तांत्रिक चमत्कार राहिलेली नसून, ती मोठ्या प्रमाणावर राबवता येण्याजोगी एक विश्वसनीय आरोग्य सेवा म्हणून उदयाला येत आहे.
ही कामगिरी केवळ एक तांत्रिक चमत्कार नसून, तिचे परिणाम अत्यंत दूरगामी आहेत. भारत, ज्याची ओळख प्रदीर्घ काळापासून ‘मेडिकल पर्यटना’चे जागतिक केंद्र म्हणून आहे, तो आता भौगोलिक सीमा ओलांडून ‘रिअल-टाइम’ वैद्यकीय तज्ज्ञता देणारा एक सामर्थ्यशाली देश म्हणून प्रस्थापित होत आहे. आता प्रगत उपचारांसाठी रुग्णांना सातासमुद्रापार प्रवास करण्याची ओढ राहणार नाही; तर भारतीय डॉक्टर स्वतः डिजिटल माध्यमाद्वारे जगभरातील रुग्णांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे उपचारांमधील विलंब टाळता येईल, प्रवासाचा आणि इतर तांत्रिक गोष्टींचा ताण कमी होईल आणि तज्ञ वैद्यकीय सेवा जगभरात कोठेही सहज उपलब्ध होतील.
या क्रांतिकारी बदलाच्या केंद्रस्थानी ‘रुग्ण प्रथम’ हा विचार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाची गुंतागुंत टाळून रुग्णांना तज्ञ शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे, केवळ त्यांची सोयच वाढवत नाही, तर यामुळे वेळेवर उपचार मिळून रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यताही वाढते. ही ‘सीमाविरहित आरोग्यसेवेच्या’ (Borderless Healthcare) एका अशा सामर्थ्यशाली युगाची सुरुवात आहे, जिथे जगातील सर्वोत्तम डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित न राहता, कोणत्याही ठिकाणी आणि कधीही जीवनरक्षक शस्त्रक्रिया करू शकतील.
ही ऐतिहासिक कामगिरी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलला अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान-आधारित आरोग्यसेवेचे एक ‘जागतिक कमांड सेंटर’ म्हणून ओळख प्रदान करते. वैद्यकीय नैपुण्ये आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा समन्वय आरोग्यसेवेच्या सुलभतेची व्याख्या कशी बदलू शकतो, याचाच हा एक जिवंत पुरावा आहे. जसजसे ‘रिमोट सर्जरी’चे तंत्रज्ञान अधिक विकसित होईल, तसतशी ही क्षमता जगभरातील आरोग्य सेवा वितरणाचे भविष्य घडवण्यात अत्यंत निर्णायक भूमिका बजावेल.


