पुणे, दि. २३ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थिनींना ‘मुव्हींग मिलियन्स’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. तसेच याच स्पर्धेत बीएनसीएमधील आणखी दोन गटांच्या प्रशंसनीय कामाबद्दल त्यांनाही प्रत्येकी दहा हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा २५ हजार रुपयांचा पुरस्कार दिल्लीमधील योजना आणि वास्तूकला विद्यालय (एसपीए) या संस्थेला मिळाला. आगामी उज्जैन सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व वाहतूक नियोजनासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवरील महत्वाची संस्था असणाऱ्या योजना आणि वास्तूकला विद्यालय (एसपीए) भोपाळ, तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले असून देशभरातील नियोजन तसेच अर्किटेक्चर शिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्यात सहभाग घेतला होता. एप्रिल २०२८ मध्ये मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महिनाभरासाठी आयोजित केलेल्या सिंहस्थ महामेळाव्यातील सुमारे ३० कोटी भाविकांच्या अपेक्षित गर्दीला कसे हाताळता येईल यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळालेल्या गटात गिरीजा गणोरकर, नुपूर बोधे, ऋतूजा बिल्लाडे, सानिका कोरडे आणि प्राची थोरवे या विद्यार्थिनींचा सहभाग असून त्यांना बीएनसीएमधील जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली विभाग) भूमी रिसर्च लॅबच्या प्रमूख डॉ. अमृता गरूड यांचे मार्गदर्शन लाभले. जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने उज्जैन येथील गर्दीचे नियोजन कसे करता येईल हे या गटाने प्रभावीपणे सादर केले.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांनी विजयी गटाच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. डॉ.कश्यप यांनी मोठ्या प्रमाणातील गर्दी व्यवस्थापन व निर्णयप्रक्रीयेत आर्किटेक्ट्सची भूमिका महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. विशेषतः सिंहस्थसारख्या महाआयोजनासाठी ते गरजेचे आहे, असे ते म्हणाले. उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांनी पदवीपूर्व आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनींचा नियोजन केंद्रीत राष्ट्रीय स्पर्धा जिंकणे हे त्यांच्या मजबूत आंतरविद्याशाखीय अभ्यास क्षमतेचे द्योतक असल्याचे नमूद केले.
डॉ. अमृता गरूड म्हणाल्या की, या स्पर्धेत उज्जैन मधील क्षिप्रा नदीवरील राम घाट या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणाचे जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित धोरणात्मक पद्धतीने गर्दी हाताळण्याच्या नियोजनाचे सादरीकरण प्रभावी ठरले. त्याठिकाणी असणाऱ्या प्रवेश अणि बाहेर जाण्याचे मार्ग तसेच तेथून आत व बाहेर जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे लोंढे, आपत्कालीन मार्गांचा प्रस्ताव, यासाठी वेळेचे नियोजन आणि ठीकठिकाणी मार्गदर्शक फलक आणि अडचणीच्या ठिकाणांबाबत धोरणात्मक व्यवस्थापनाचे मार्ग सुचवले होते. याशिवाय वृद्ध, बालके, महिला आणि दिव्यांगांसाठीही सुगम्य उपाय सुचव
ले होते.


