पुणे: महानगरातील विविध वस्त्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलनांना पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अंतिम आकडेवारीनुसार २ लाख १० हजार ५२२ नागरिक या संमेलनात सहभागी झाले आहेत. शहरातील ४०५ वस्त्यांमध्ये पार पडलेल्या या संमेलनांमधून जातीपातींच्या भिंती तोडून सामाजिक समरसतेचा आणि संविधानिक कर्तव्यांचा जागर करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने समाजातील सज्जनशक्तीला संघटित करण्यासाठी या संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने ‘पंच परिवर्तना’वर (सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध आणि नागरिक कर्तव्य) विशेष भर देण्यात आला. संमेलनांमध्ये उपस्थित हिंदू बांधवांना संबोधित करताना, समाजातील जातीपातींना मूठमाती देऊन एकसंध राष्ट्र निर्माण करण्याचा आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला. देशहितासाठी सामाजिक ऐक्य ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
हिंदू संमेलनांतील अनेक महिला वक्त्यांनी पंच परिवर्तन हा विषय मांडला तसेच उपस्थितांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. एकूण उपस्थितांपैकी १ लाख १३ हजार ९०० पुरुष, तर ९६ हजार ६२२ महिलांनी उपस्थिती लावली. “राष्ट्रीय विचारांच्या अनुकूल सज्जनशक्तीला जोडण्यासाठी हिंदू संमेलने उत्तम माध्यम ठरले. सांस्कृतिक आणि विद्येच्या माहेरघरात झालेल्या या जनसागराच्या दर्शनामुळे हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक सलोखा अधिक मजबूत होताना दिसत आहे.
पुणे महानगर : भागनिहाय संमेलनांची स्थिती
१. हडपसर – ५४
२. छत्रपती संभाजीनगर- ६७
३. येरवडा- ३७
४. विद्यापीठ भाग – ४३
५. सिंहगड रोड- ३८
६. कात्रज- ५१
७. वडगाव शेरी- ४६
८. कसबा- ४४
९. पर्वती- २५


