Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमपीएलसाठी निवड चाचणी महाराष्ट्रातून ईगल नाशिक टायटन्स संघाला मोठा प्रतिसाद

एमपीएलसाठी निवड चाचणी महाराष्ट्रातून ईगल नाशिक टायटन्स संघाला मोठा प्रतिसाद

नाशिक, २४ एप्रिल २०२६: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेसाठी गतविजेता संघ ईगल नाशिक टायटन्सने चौथ्या मोसमासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. ही चाचणी पुणे येथील माव्हरिक्स क्रिकेट अकॅडमी आणि नाशिकमधील क्रीडा अकॅडमी येथे घेण्यात आली. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने खेळाडू आले होते. नाशिक संघात स्थान मिळवण्यासाठी आयोजित या निवड चाचणीला मोठा प्रतिसाद मिळाला.

 

दोन दिवस चाललेल्या या चाचणीमध्ये १००० हून अधिक उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला. यावरून महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि विशेषतः या लीग मधील सर्वांत लोकप्रिय संघ ईगल नाशिक टायटन्सला मिळणारी पसंती दिसून येते. या निवड चाचणीत १४ ते ४० वयोगटातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गेल्या तीन हंगामांत ईगल नाशिक टायटन्स संघाने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नवीन गुणवत्ता शोधण्यात, त्यांना पाठिंबा देण्यात आणि घडवण्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यामुळे ही फ्रँचायझी संपूर्ण राज्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनली आहे. त्यामुळेच निवड चाचणीत तळागाळातील खेळाडू सहभागी झाले होते.

एमपीएलचे गतविजेते ईगल नाशिक टायटन्स चौथ्या मोसमातही आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळणारे प्रशांत सोळंकी (कोलकाता नाइट रायडर्स), मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्ज), साहिल पारख (दिल्ली कॅपिटल्स) आणि अर्शिन कुलकर्णी (लखनौ) हे नाशिक संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे चौथ्या मोसमातही नाशिक संघाचेच पारडे जड असणार आहे. यावरून या संघाचा भाग होण्याच्या दृष्टीने निवड चाचणीत सहभाग नोंदवला.

ईगल नाशिक टायटन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राज कमल म्हणाले, पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी निवड चाचणीला मिळालेला प्रतिसाद खरोखरच उत्साहवर्धक आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळायला हवी, यावर आमचा विश्वास आहे. आणि ही उपस्थिती लोकांचा फ्रँचायझीवर असलेला विश्वास दर्शवते. गतविजेते म्हणून आम्ही चौथ्या मोसमासाठी केवळ एक मजबूत संघ बनवण्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रातील क्रिकेट कौशल्याच्या वाढीसाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासाठीही कटिबद्ध आहोत.

ईगल नाशिक टायटन्सचे क्रिकेट संचालक समद फल्लाह म्हणाले, पुणे आणि नाशिकमध्ये आम्हाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. १००० हून अधिक खेळाडू ज्या जिद्दीने आणि उत्साहाने उपस्थित राहिले, त्यावरून एमपीएल आणि आमची फ्रँचायझी उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते. आमचे ध्येय राज्यातील सर्वोत्तम गुणवत्ता शोधून त्यांना घडवणे आणि चौथ्या मोसमासाठी एक मजबूत व स्पर्धात्मक संघ तयार करणे हे आहे.

 

गुणवत्तेचे बारकाईने निरीक्षण

ही निवड चाचणी आगामी हंगामाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. नाशिकच्या संघव्यवस्थापन आणि सहायक वर्गाने राज्यभरातून आलेल्या गुणवान खेळाडूंचे बारकाईने निरीक्षण केले. दोन्ही ठिकाणी दिसलेली ऊर्जा, सहभाग आणि उत्साह पाहता, महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात ईगल नाशिक टायटन्स संघाचा दर्जा किती उंचावला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता हा संघ नवीन आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत असून, एमपीएलच्या चौथ्या मोसमात आपले जेतेपद राखण्यासाठी एक मजबूत संघ उभारण्याच्या तयारीला लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments