पुणे, २३ एप्रिल २०२६: पश्चिम घाटात करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातून या प्रदेशातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. संशोधकांना या काळात ऐतिहासिक नोंदींनुसार असलेल्या एकूण ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) प्रजातींपैकी फक्त ६५ टक्के प्रजातींचे दस्तऐवजीकरण करता आले. म्हणजे, पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कीटकांच्या ज्ञात विविधतेमध्ये जवळपास ३५ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये पाच राज्यांमधील १४४ ठिकाणांवरील ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) यांसारख्या कीटकांचा गट ओडोनाटा प्रजातींचे मॅपिंग करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर १६०० किलोमीटरपर्यंत पसरलेले आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त जैवविविधता हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटातील गोड्या पाण्यामधील जैवविविधतेचे मूल्यांकन करण्याचा हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रयत्न आहे.
डॉ. पंकज कोपर्डे (सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे), अराजुश पायरा (पीएचडी स्कॉलर, एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे), अमेय देशपांडे (एमएससी विद्यार्थी, एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे) आणि रेजी चंद्रन (सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज, केरळ) या संशोधन टीमने नद्या, ओढे, धबधबे, तलाव, सरोवरे आणि धरणे यांसारख्या गोड्या पाण्यातील अधिवासांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध क्षेत्रीय काम केले. यातील अनेक ठिकाणे दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण होती, जेथे त्यांना भौगोलिक परिस्थिती व अधिकृत परवानग्यांची गरज यांमुळे आव्हानांचा सामना करावा लागला.
या संशोधनादरम्यान, संशोधन टीमने ओडोनाटाच्या १४३ विविध प्रजातींची नोंद केली, ज्यामध्ये पश्चिम घाटातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ४० प्रजातींचा समावेश आहे. पण, ही एकूण संख्या या प्रदेशातील ऐतिहासिक नोंदींनुसार असलेल्या प्रजातींच्या फक्त ६५ टक्के आहे. ही मोठी तफावत प्रजातींची संख्या घटणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास होण्याबद्दल गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.
ओडोनाटा हे पर्यावरणातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असतात, कारण त्यांचे पुनरुत्पादन पूर्णपणे गोड्या पाण्यातील परिसंस्थेवर अवलंबून असते. परिणामी, त्यांना “इंडिकेटर टॅक्सा” (पर्यावरणीय सूचक) मानले जाते; म्हणजे, त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती प्रत्यक्ष जलीय स्रोतांच्या पर्यावरणीय आरोग्याला निदर्शनास आणते. संशोधकांच्या मते, या न सापडलेल्या प्रजाती परिसंस्थेवर येत असलेल्या खोलवरच्या तणावाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
हे संशोधन पश्चिम घाटातील वाढत्या आणि बहुआयामी धोक्यांकडे लक्ष वेधते. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, जलविद्युत प्रकल्प, गंभीर प्रदूषण आणि जमिनीच्या वापरातील मोठ्या प्रमाणावरील बदल यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अनियंत्रित पर्यटन, वारंवार लागणारे वणवे आणि हवामान बदलाचा वाढता प्रभाव यामुळे या परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे.
नोंद करण्यात आलेल्या प्रजातींची संवर्धनाची स्थिती देखील चिंतेत भर घालणारी आहे. एलाटोनेउरा सौटेरी, प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा आणि सायक्लोगॉम्फस यप्सिलॉन या तीन प्रजाती सध्या ‘असुरक्षित’ म्हणून वर्गीकृत केल्या गेल्या आहेत. पण, सर्वेक्षणात आढळलेल्या बहुतेक प्रजाती आययूसीएन रेड-लिस्ट ऑफ थ्रेटन स्पेसीजमध्ये ‘माहितीचा अभाव’ आणि ‘मूल्यांकन न झालेली’ या श्रेणींमध्ये येतात, ज्यामधून या विषयासंदर्भात वैज्ञानिक ज्ञानाची मोठी कमतरता दिसून येते.
या संशोधनामध्ये राज्यानुसार आढळणाऱ्या विविधतेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वाधिक १०५ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या महाराष्ट्रात १०० प्रजातींची नोंद झाली, ज्यामध्ये १२ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा समावेश आहे. केरळमध्ये कमी ठिकाणी (१४) नमुने घेतले आहेत, जेथे वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेची उच्च एकाग्रता दिसून आली. तिथे आढळलेल्या ८३ प्रजातींपैकी ३३ प्रजाती वैशिष्ट्यपूर्ण होत्या. कर्नाटकमध्ये (१७ ठिकाणे) ६४ प्रजाती आणि ६ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची नोंद झाली. गोव्यामध्ये (३ ठिकाणे) ३५ प्रजातींसह ४ वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींची नोंद झाली, तर गुजरातमध्ये (५ ठिकाणे) १८ प्रजाती आढळल्या, पण तिथे एकही वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती दिसून आली नाही.
या निष्कर्षांबाबत मत व्यक्त करत डॉ. पंकज कोपर्डे यांनी संशोधन कार्याचा विस्तार करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “हे संशोधन पश्चिम घाटातील ओडोनाटाच्या आजवरच्या सर्वात व्यापक सर्वेक्षणांपैकी एक आहे. आम्हाला दक्षिण ते उत्तर अशा रचनेत बदल दिसून आला आहे, ज्याचे अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. आमचे सर्वेक्षण घाटातील ज्ञात ओडोनाटा प्रजातींपैकी फक्त ६५ टक्के प्रजाती शोधू शकले, ज्यामधून प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाचा संभाव्य ऱ्हास निदर्शनास येतो.” ते पुढे म्हणाले, “हे संशोधन सध्याच्या साहित्यात मोलाची भर घालते, एक महत्त्वाची पोकळी भरून काढते आणि ओडोनाटा-समृद्ध क्षेत्रांना संवर्धनासाठी प्राधान्य देण्याचा पाया रचते.”
१४४ ठिकाणी करण्यात आलेले हे सर्वेक्षण पश्चिम घाटामधील भविष्यातील पर्यावरणीय निरीक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाया स्थापित करते. तसेच, हे संशोधन गंभीर चेतावणी देखील देते: प्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास आणि परिसंस्थेचे विखंडन रोखण्यासाठी तातडीचे व शाश्वत प्रयत्न केले नाहीत, तर या प्रदेशामधील फक्त वैयक्तिक प्रजाती नाही, तर त्या प्रजाती ज्या नाजूक गोड्या पाण्याच्या यंत्रणा टिकवून ठेवण्यास मदत करतात, त्या यंत्रणा देखील गमावण्याचा धोका आहे.
==========================================================================================================================================


