Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये रंगला दृष्टीहीन वरदान-शामल यांचा विवाह सोहळा

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये रंगला दृष्टीहीन वरदान-शामल यांचा विवाह सोहळा

सेवा मित्र मंडळ आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या सहकार्याने आयोजन

पुणे : बॅण्डबाजासह निघालेली वरात…ढोल-ताशांच्या गजरात आनंदाने थिरकणारे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते…स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते घरसंसारात लागणाऱ्या साहित्यापर्यंत सजलेले रुखवत…प्रत्येक क्षणी साथ देणारे, आणि आपलेपण जपणाऱ्यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांच्या सुरात दृष्टिहीन असणारे वरदान आणि शामल यांचा विवाह सोहळा रंगला.

सेवा मित्र मंडळ आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या सहकार्याने दृष्टीहीन जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात करण्यात आले होते. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री राजेश पांडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, नगरसेवक सुनील पांडे, स्वप्नाली पंडित, डॉ.मिलिंद भोई, ॲड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, विश्वास भोर, राजाभाऊ कदम, दीपक वनारसे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, सचिन ससाने, प्रशांत मते, यावेळी उपस्थित होते. सिद्धार्थ शहा त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र दिले. कन्यादान सतीश व सुनेत्रा राचेल्ला यांनी केले.

वधू शामल महादेव धेंडे ही कोथरूड अंधशाळेची विद्यार्थिनी असून वर वरदान सिंह हरजीत सिंह भादा हा कोरेगाव पार्क मधील शाळेचा विद्यार्थी आहे. दोघांचीही शाळेच्या स्पर्धेदरम्यान ओळख झाली. वरदान याचा मोबाईल ॲक्सेसरीज चा व्यवसाय आहे तर शामल ही जेजुरी मधील पेन्सिल पॅकेज कंपनीमध्ये काम करते. तसेच ती बास्केट, हॅन्डमेड प्रोडक्ट बनवते आणि प्रदर्शनात त्याची विक्री करते. दोघांचीही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे.

शिरीष मोहिते म्हणाले, दृष्टीहीन बांधवांनाही आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण अनुभवता यावा, हा आमचा प्रयत्न आहे. या विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून केवळ दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे, दोन आयुष्यांचे सुंदर रेशीमबंध जुळत आहेत. लग्न सोहळ्याचे यंदा १२ वे वर्ष आहे. १९ दिव्यांग जोडप्यांचे विवाह या उपक्रमाच्या माध्यमातून झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments