पुणे,28 एप्रिल 2026 : विश्वराज हॉस्पिटल,लोणी मधील डॉक्टरांच्या टीम ने एका 28 वर्षीय आयटी व्यावसायिक पुरूष रूग्णावर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गाईडेड सिस्टो गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करत स्वादुपिंडामध्ये तयार झालेली द्रवयुक्त गाठ (पॅनक्रिएटिक स्युडोसिस्ट) काढण्यात यश मिळवले.जरी ही प्रक्रिया नेहमी केली जात असली तरी अशा स्थितीत 12 सेमीची गाठ सहसा दिसत नाही.या प्रक्रियेत 1500 मिली द्रवाचा निचरा करण्यात आला.
याबाबत माहिती देताना विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील पोटविकार तज्ञ डॉ.प्रविश घुरडे म्हणाले की,हा तरूण जेव्हा आमच्याकडे आला होता,तेव्हा त्याला पोटात तीव्र वेदना,ताप,भुक न लागणे,मळमळणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणे होती.आमच्याकडे येण्याआधी त्याने बाहेर सल्ला घेऊन सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी या निदान चाचण्या करून घेतल्या होत्या.त्यातून त्याच्या स्वादुपिंडात द्रवयुक्त मोठी गाठ (12 सेमी) असल्याचे निदान झाले होते.
अशा प्रकारची गाठ सहसा पॅनक्रियाटायटिस या स्थितीनंतर होणाऱ्या गुंतागुंतींमधून दिसून येते.याला पॅनक्रिएटिक स्युडोसिस्ट असे म्हणतात.ही एक सामान्य गुंतागुंत आहे,जिथे पॅनक्रियाटायटिस नंतर 4 ते 6 आठवडे अशा प्रकारची गाठ निर्माण होते.ही गाठ सहसा कर्करोगग्रस्त नसून याचा निचरा आपोआप होतो.कारण याचा आकार 4 ते 5 सेमी इतका असतो.मात्र या तरूणाच्या बाबतीत ही गाठ 12 सेमी इतकी होती.
डॉ.घुरडे पुढे म्हणाले की,त्यामुळे आम्ही एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गाईडेड सिस्टो गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.ही एक कमीत कमी छेद असणारी प्रभावी प्रक्रिया असून पॅनक्रिएटिक स्युडोसिस्टचा निचरा पोटावाटे करण्यासाठी वापरली जाते.या तंत्रात अल्ट्रा साऊंड गाईडेड एंडोस्कोप वापरण्यात येतो,जेणे करून निर्माण झालेली गाठ आणि पोटात संपर्क स्थापन करता येतो.यामुळे अंतर्गत निचरा होऊन शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.यातील कलर डॉपलर इमेजिंगमुळे संपर्क स्थापन करताना कुठलीही रक्तवाहिनी मध्ये येत नाही ना याची खात्री होते आणि प्रक्रिया अधिक सुरक्षित होते.या मार्गात मेटल स्टेंट टाकला जातो,जेणे करून द्रव पदार्थाचा सातत्याने निचरा होतो.
या प्रक्रियेला साधारण दोन तास लागले.रूग्णाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले.प्रक्रियेचे यश हे लक्षणे कमी होण्यावरून दिसून येते.त्याचबरोबर साधारण 15 दिवसाने सोनोग्राफी केल्यावर ही गाठ रिकामी झाली आहे का ते दिसून येते.डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ.प्रविश घुरडे यांच्यासह भूलतज्ञ डॉ.क्षितिज गायकवाड यांचा समावेश होता.


