पुणे दि. ५:- राज्यात अँग्रीस्टॅक योजनेअंतर्गत वनपट्टे धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्याचे काम सुरू असून या प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यांनी या मोहिमेला प्राधान्य देऊन कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वनपट्टे धारक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी तसेच कृषी विभाग यांच्यामार्फत समन्वयाने काम सुरू आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून वनपट्टे धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी सुरू असून ४ मे २०२६ पर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण २८०५ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. तथापि, काही जिल्ह्यांमध्ये नोंदणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शिल्लक शेतकऱ्यांची नोंदणी तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ग्रामीण भागात जनजागृती करून वनपट्टे धारक शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक असून, नजीकच्या सुविधा केंद्रांमार्फत सदर नोंदणी प्रक्रिया करणेबाबत वनपट्टा धारक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.
सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अँग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक (ॲग्रीस्टॅक) अंकुश माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
**


