लिंक – https://www.incredholdings.com/doc/Investor%20Relation/Others/InCred%20Holdings%20Limited%20-%20UDRHP-I%20(signed)%20(1).pdf
इनक्रेड होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः तिची महत्त्वाची उपकंपनी इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (इनक्रेड फायनान्स) हिच्या माध्यमातून काम करते. ‘क्रिसिल’च्या माहितीनुसार, एफवाय-23 ते एफवाय-25 या कालावधीत नफ्यातील वार्षिक वाढीच्या बाबतीत भारतातील सर्वात वेगाने वाढणारी बहुआयामी एनबीएफसी कंपनी म्हणून इनक्रेड फायनान्सची ओळख आहे. तसेच, व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (एयूएम) वाढीत ही कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी एनबीएफसी ठरली आहे. कंपनीने आता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या बाजार नियामक संस्थेकडे ‘अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस-1’ (यूडीआरएचपी – 1) दाखल केला आहे.
‘इनक्रेड होल्डिंग्स लिमिटेड’चा जवळपास संपूर्ण महसूल आणि बहुतांश व्यवसाय हा तिची महत्त्वाची उपकंपनी इनक्रेड फायनान्स हिच्या माध्यमातून येतो. इनक्रेड फायनान्स ही सर्वसामान्य ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणारी, विविध प्रकारच्या कर्जसेवा देणारी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत अशी मध्यम स्तरातील एनबीएफसी कंपनी आहे.
भुपिंदर सिंग यांनी 2017मध्ये स्थापन केलेली इनक्रेड फायनान्स ही कंपनी ग्राहकांच्या विविध गरजांनुसार कर्ज योजना उपलब्ध करून देते. सर्वप्रथम जोखमीचा विचार करण्याची कार्यपद्धती, तंत्रज्ञानाधारित प्लॅटफॉर्म, व्यापक मल्टी-चॅनेल वितरण जाळे आणि अनुभवी व्यवस्थापन मंडळ यांच्या बळावर कंपनी काम करते. कंपनीकडे पाच प्रमुख विभागांमध्ये व्याप्ती असलेला बहुविध प्रकारचा कर्ज-पोर्टफोलिओ आहे. 31 डिसेंबर 2025पर्यंत कंपनीचा वैयक्तिक कर्जांचा ‘एयूएम’मधील वाटा सर्वाधिक 55.56 टक्के म्हणजे 8,027.12 कोटी रुपये इतका होता, शैक्षणिक कर्जांचा वाटा 22.15 टक्के म्हणजे 3,200.51 कोटी रुपयांचा होता, तसेच मालमत्ता तारणकर्ज आणि शाळांसाठीचा वित्तपुरवठा यांचा समावेश असणाऱ्या तारणाधारित व्यावसायिक कर्जांचा वाटा 8.74 टक्के म्हणजे 1,262.64 कोटी रुपये होता. एकात्मिक आणि मालमत्ता-आधारित वित्तपुरवठ्याचा समावेश असणाऱ्या विशेष एमएसएमई कर्जांचा वाटा 7.83 टक्के म्हणजे 1,131.14 कोटी रुपयांचा होता, तर वित्तीय संस्थांना दिलेल्या कर्जांचा वाटा 5.55 टक्के म्हणजे 801.40 कोटी रुपये इतका होता.
कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 31 मार्च 2025पर्यंत 12,585.07 कोटी रुपयांची होती. कंपनीचा करपश्चात (निव्वळ) नफा (पीएटी) 373.15 कोटी रुपये होता, तर मालमत्तेवरील परतावा (आरओए) 3.45 टक्के होता. एफवाय-23 ते एफवाय-25 या कालावधीत कंपनीच्या ‘एयूएम’मध्ये 44.04 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने (सीएजीआर) वाढ झाली, तर निव्वळ नफ्यात 84.97 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे विविध प्रकारच्या एनबीएफसी कंपन्यांमध्ये नफ्याच्या वाढीच्या बाबतीत ही कंपनी सर्वात वेगाने वाढणारी ठरली आणि ‘एयूएम’वाढीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 31 डिसेंबर 2025पर्यंत कंपनीचे एयूएम 14,447.86 कोटींवर पोहोचले. या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 290.14 कोटी रुपये होता. याच कालावधीत कंपनीने 6,683.28 कोटींचे कर्जवाटप केले. ऑपरेशनल कामगिरीही स्थिर राहिली. 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत पोर्टफोलिओ यिल्ड 18.39 टक्के होते, तर एकूण कर्जउभारणीवरील सरासरी खर्च 10.05 टक्के होता. यामुळे कंपनीचे व्याजांतील अंतर (स्प्रेड्स) स्थिर असल्याचे दिसून आले.
जोखीम लक्षात घेऊन काम करण्याला कंपनी प्राधान्य देते. त्या धोरणानुसारच कंपनीची कर्जवाटपाची पद्धत आहे. यासाठी कंपनीने स्वतः विकसित केलेला एआय-सक्षम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म वापरला जातो. याचा परिणाम म्हणून ‘स्टेज-3’ कर्जांसंबंधी कंपनीचे एकूण वहन मूल्य आणि निव्वळ वहन मूल्य विविध कालावधीत स्थिर राहिले आहे. 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षात विविध प्रकारच्या समकक्ष कंपन्यांमध्ये या कंपनीचे क्रेडिट कॉस्ट 1.74 टक्के इतके असून ते सर्वात कमी प्रमाणाच्या दुसऱ्या क्रमांकावर होते. 31 डिसेंबर 2025पर्यंत एकूण स्टेज-3 कर्जांचे प्रमाण 2.28 टक्के होते. ते 31 डिसेंबर 2024 रोजी 2.05 टक्के होते. निवळ स्टेज-3 कर्जांचे प्रमाण 31 डिसेंबर 2025 रोजी 0.87 टक्के आणि 31 डिसेंबर 2024 रोजी 0.79 टक्के होते. कंपनीची कर्जवसुलीची गुणवत्ता चांगली असून वसुलीची कार्यक्षमता 98.30 टक्के होती. यासाठी 327 सदस्यांचे वसुली पथक 38 ठिकाणी काम करीत आहे.
कंपनीचे कामकाज भुपिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली चालते. त्यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील दोन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) गौरव माहेश्वरी यांना 27 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ग्राहक वित्त विभागाचे प्रमुख पृथ्वीराज चंद्रशेखर आणि शैक्षणिक व एमएसएमई कर्ज व्यवसायाचे प्रमुख सौरभ झलारिया हे दोघेही 2017 पासून कंपनीत आहेत.
कंपनीकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रत्यक्ष शाखांचे व्यापक असे मल्टी-चॅनेल वितरण जाळे आहे. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 152 शहरांमध्ये कंपनीच्या 158 शाखा आहेत. देशभरातील 17 हजारांहून अधिक पिनकोडपर्यंत तिची पोहोच आहे. कंपनीच्या धोरणात तंत्रज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. 31 मार्च 2023 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत कंपनीच्या ‘टेक टीम’मधील कर्मचाऱ्यांची संख्या 114 वरून 152 पर्यंत वाढली. कंपनीच्या ‘इनक्रेड’ नावाच्या अॅपमुळे कर्जप्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित आणि सोपी होते. 31 डिसेंबर 2025पर्यंत या अॅपचे 4.5 लाखांहून अधिक वापरकर्ते होते. कंपनीचा कर्जपुरवठादारांचा आधारही विविध प्रकारचा आहे. सार्वजनिक आणि खासगी बँका, म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, विकास वित्त संस्था आणि स्मॉल फायनान्स बँकांसह एकूण 51 संस्थांकडून कंपनीला निधी मिळतो.
कंपनीचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर) 24.97 टक्के आहे. नियामकांनी ठरवून दिलेल्या 15 टक्क्यांच्या किमान मर्यादेपेक्षा ते खूप जास्त आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीला क्रिसिल रेटिंग्ज लि. आणि इक्रा लि. यांच्याकडून ‘एए-/स्थिर’ असे पतमानांकन मिळाले आहे.
या ‘आयपीओ’मध्ये 1,250 कोटींपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. तसेच, 9,90,20,833 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) देखील असेल. या ‘ऑफर फॉर सेल’मध्ये केकेआर इंडिया फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स पीटीई. लिमिटेड, एमएनआय व्हेंचर्स, एमईएमजी फॅमिली ऑफिस एलएलपी आणि व्ही’ओशन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांसारख्या अनेक भागधारकांचा सहभाग असेल.
कंपनी या इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी प्रामुख्याने तिची पूर्ण मालकी असलेल्या इनक्रेड फायनान्स या उपकंपनीमध्ये गुंतवणार आहे; जेणेकरून तिचा भांडवली पाया अधिक मजबूत करता येईल. हा निधी टियर-1 भांडवल वाढवण्यासाठी, पुढील कर्जवाटपाला पाठबळ देण्यासाठी आणि उपकंपनीचा सीआरएआर सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे.
या इश्यूचे बँकर्स म्हणून आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, इनक्रेड कॅपिटल वेल्थ पोर्टफोलिओ मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि यूबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


