*स्वीप उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन*
पुणे, दि. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि युथ फॉर जॉब्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्लेसमेंट अँड रिलेशन हॉलमध्ये पदवीधर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मतदार जनजागृती करण्यात येवून विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.
या मेळाव्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांतर्गत पदवीधर दिव्यांग विद्यार्थी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करून मतदान नावनोंदणी, दुरस्ती व मतदान कार्ड काढण्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विभाग प्रमुख डॉ. गीता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, समाजसेवक पांडुरंग महाडिक, स्वीप समन्वयक दिपक कदम, सागर काशिद, डॉ धनंजय भोले यांच्यासह ९४ दिव्यांग पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते.
*शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जनजागृती उपक्रमांचे आयोजन*
पुणे महानगरपालिकेचे घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय, औंध क्षेत्रिय कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, सोमेश्वर मंदिर जवळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल बोपोडी इत्यादी मागील लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेल्या भागात मतदान जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे व मतदानासाठी इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
पात्र व्यक्तींना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यासोबतच शंभर टक्के मतदान करण्याबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानात सहभागी होण्याची ग्वाही दिली. संत रामदास स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीदेखील रॅलीद्वारे मतदान करण्याचा संदेश दिला. बचत गटातील महिलांना ॲपच्या सहाय्याने मतदार नोंदणी करण्यातबाबत मार्गदर्शनदेखील करण्यात आले.
यावेळी सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, समाजसेवक पांडुरंग महाडिक, स्वीप समन्वयक दिपक कदम, सागर काशिद, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व समूह संघटिका वैशाली फुलसुंदर, मनिषा वाघ, समुपदेशक गौरी कासार, स्वीप समन्वयक दिपक कदम, सागर काशीद आदी उपस्थित होते.


