पुणे, दि. 25 (जिमाका, वृत्तसेवा) : बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे शहर अंतर्गत आरटीओ चौक परिसरातील वाढती वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने वाहतुकीत काही तात्पुरते बदल प्रस्तावित करण्यात आले असून, त्याबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित बदलांनुसार, शाहीर अमर शेख चौकाकडून येऊन आरटीओ चौकातून उजवीकडे वळून येरवडा, रूबी हॉल परिसर व जहांगीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
तसेच शाहीर अमर शेख चौकाकडून येणाऱ्या वाहनांना आरटीओ चौकातून डावीकडे वळून सुमारे १०० मीटर पुढे जाऊन संगम ब्रिजपूर्वी यू-टर्न घेऊन येरवडा, रूबी परिसर व जहांगीर चौकाकडे जाण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरटीओ चौकातील कोको पेट्रोलपंप ते संगम ब्रिज दरम्यान वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा सुमारे ३०० मीटरचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
याशिवाय इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून संगम ब्रिजमार्गे आरटीओकडे येणाऱ्या वाहनचालकांनी डाव्या बाजूच्या पुलाचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रस्तावित बदलांबाबत नागरिकांनी सूचना किंवा हरकती असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे येथे ६ जून २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून तसेच फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आवश्यक सवलत देऊन अंतिम आदेश जारी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी कळविले आहे.
0000


