पुणे, ७ ऑक्टोबर: भारताच्या विविध राज्यांमधील कला, हस्तकला, वस्त्रोद्योग, फॅशन आणि जीवनशैलीचा समृद्ध वारसा एकाच छताखाली आणणारा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ हा उपक्रम ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान द पूना क्लब लिमिटेड, बंड गार्डन रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
पारंपरिक भारतीय कला आणि हस्तकलेला आधुनिक फॅशन व लाइफस्टाइलशी जोडण्याच्या उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘शिखाज् कारीगरी’ आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय एक्स्पोमध्ये विविध राज्यांच्या पारंपरिक कला व हस्तकला, फॅशन, लाइफस्टाइल उत्पादने तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. एक्स्पोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी आहे. या चार दिवसांतील सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश मोफत व सर्वांसाठी खुला आहे.
भारतीय हस्तकला आणि पारंपरिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याबरोबरच उद्योजक, कारागीर, डिझायनर्स, विद्यार्थी आणि ग्राहक यांना एकत्र आणणे हा या एक्स्पोचा उद्देश आहे. चार दिवसांच्या कालावधीत विविध विषयांवरील चर्चासत्रे आणि व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत.
एक्स्पोमध्ये सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे, एसईझेड आणि निर्यातविषयक संधी, भारतीय वस्त्रोद्योग व निर्यात प्रोत्साहन योजना, स्टार्टअप इकोसिस्टम आणि केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजना व लाभ यावर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.
सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे या विषयावर महाराष्ट्र पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र शासनाचे डीजीएम यशस्वी यादव, आयपीएस मार्गदर्शन करणार आहेत. एसईझेड आणि निर्यातविषयक संधी या विषयावर जॉईंट डेव्हलपमेंट कमिशनर, एसईईपीझेड-एसईझेड, पुणे क्लस्टर मितल हिरेमठ माहिती देणार आहेत.
भारतीय वस्त्रोद्योग आणि निर्यात प्रोत्साहन योजनांवर हँडलूम एक्स्पोर्ट प्रमोशनल कौन्सिल (HEPC) तर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. स्टार्टअप इकोसिस्टम आणि केंद्र सरकारच्या योजना या विषयावर स्टार्टअप इंडिया तर्फे सत्र होणार असून, एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजना व लाभ याबाबत डीएफओ, मुंबई, एमएसएमई मंत्रालयाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय एक्स्पोमध्ये प्रख्यात सारंगीवादक उस्ताद कमाल साबरी आणि जॉली पायपर्स आपली कला सादर करतील. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवरील फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असून, त्यात भारतीय पारंपरिक पोशाख आणि आधुनिक फॅशनचा संगम पाहायला
मिळणार आहे.


