Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedगिरिप्रेमीच्या युवा एव्हरेस्टवीरांचा भव्य नागरी सत्कार संपन्न 

गिरिप्रेमीच्या युवा एव्हरेस्टवीरांचा भव्य नागरी सत्कार संपन्न 

 

 

पुणे, दि. 8 जून २०२६

 

गिरिप्रेमीच्या २०२६ च्या एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा भव्य नागरी सत्कार रविवारी मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक शिखरवीर अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे व सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला गिर्यारोहक, साहसप्रेमी, विद्यार्थी, समर्थक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

 

या सोहळ्यास प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सुरेश हावरे, ज्येष्ठ अभिनेते, लेखक व निर्माते गिरीश कुलकर्णी, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ए. के. सिंग, संस्कृती प्रशालेचे संस्थापक कर्नल (निवृत्त) डॉ. गिरिजाशंकर मुंगली, गिरिप्रेमीचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, मोहिम नेते उमेश झिरपे, गिरिप्रेमीचे संस्थापक आनंद पाळंदे व उषः प्रभा पागे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर जयंत तुळपुळे यांनी प्रास्ताविक केले. मोहिमाप्रमुख उमेश झिरपे यांनी एव्हरेस्ट मोहिमेचा आढावा घेताना मोहिमेची तयारी, हिमालयातील आव्हाने, संघभावना आणि यशामागील नियोजन याविषयी माहिती दिली.

 

यावेळी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, “एव्हरेस्ट मोहीम हे कधीच एका व्यक्तीचे यश नसते. अनेक वर्षांची तयारी, शिस्त, त्याग, संघभावना आणि सामूहिक प्रयत्न यांचा तो परिपाक असतो. या युवा गिर्यारोहकांनी दाखवून दिलेली जिद्द, चिकाटी आणि मानसिक ताकद ही प्रेरणादायी आहे. गिरिप्रेमीचे ध्येय केवळ शिखर चढाईपुरते मर्यादित नसून सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार युवक घडविणे हे आहे.”

 

यानंतर “एव्हरेस्ट मोहिमेचा प्रवास” ही विशेष दृकश्राव्य चित्रफीत सादर करण्यात आली. मोहिमेची पूर्वतयारी, खुम्बू हिमनदी, विविध तळ, प्रतिकूल हवामान, अंतिम शिखर चढाई आणि यशाचे क्षण यांचा प्रभावी आढावा या चित्रफितीतून मांडण्यात आला.

 

एव्हरेस्टवीर अखिल काटकर, मिहिर जाधव आणि विवेक शिवदे यांच्यासह मोहिमेतील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर निकुंज शाह, अखिल काटकर, मिहिर जाधव आणि विवेक शिवदे यांनी मोहिमेतील अनुभव कथन केले. डेथ झोनमधील आव्हाने, प्रतिकूल हवामानाशी केलेला सामना, संघभावनेचे महत्त्व आणि एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकावतानाचे भावनिक क्षण त्यांनी उपस्थितांसमोर उलगडले.

 

प्रमुख पाहुणे गिरीश कुलकर्णी यांनी एव्हरेस्टवीरांचे अभिनंदन करताना सांगितले, “आजच्या काळात झटपट यशाची अपेक्षा केली जाते. मात्र एव्हरेस्टसारखी कामगिरी आपल्याला संयम, सातत्य, समर्पण आणि दीर्घकालीन प्रयत्नांचे महत्त्व शिकवते. या युवा गिर्यारोहकांनी कृतीतून प्रेरणेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.”

 

डॉ. सुरेश हावरे यांनी गिरिप्रेमीच्या चार दशकांहून अधिक काळाच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले, “मोठी स्वप्ने पाहणारे आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे युवक समाजाला दिशा देतात. गिरिप्रेमीसारख्या संस्था धैर्य, नेतृत्व आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण तरुण घडवत आहेत. एव्हरेस्टवीरांचे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.”

 

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ए. के. सिंग यांनी गिर्यारोहण आणि लष्करी जीवनातील साम्य अधोरेखित करताना सांगितले, “उंच हिमालयात आणि रणांगणावर यश मिळवण्यासाठी शिस्त, नेतृत्व, परस्परांवरील विश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. या युवा गिर्यारोहकांनी हे सर्व गुण उत्कृष्टपणे प्रदर्शित केले आहेत.”

 

राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गिरिप्रेमीच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “गेली चार दशके गिरिप्रेमी साहस, गिर्यारोहण आणि राष्ट्राभिमानाची परंपरा जपत आहे. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणाऱ्या या युवा गिर्यारोहकांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावले आहे.”

 

कार्यक्रमात गिरिप्रेमीशी संबंधित तीन साहसवीरांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. सुरज कुर्तडकर यांचा अमेरिकेतील प्रतिष्ठित ग्रॅव्हल सायकल रेसिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. सिद्धार्थ गाडेकर, गिरिप्रेमीचा सदस्य व स्की-माउंटेनिअर, याचा नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ६९ वर्षीय ट्रेकर स्नेहलता मेंगसे यांचा हिमालयातील अनेक तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करून साहस, चिकाटी आणि जिद्दीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

 

यावेळी गिरिप्रेमीतर्फे मेंटॉक कांग्री या शिखरावर महिलांची मोहीम तसेच युवकांसाठी विशेष हिमालयीन मोहिमांची घोषणा करण्यात आली. साहस क्षेत्रात अधिकाधिक युवक-युवतींना संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

मनोज कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रगीताने समारोप झाला.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असून देश-विदेशातील हजारो साहसप्रेमींनी ऑनलाइन माध्यमातू

न या सोहळ्यात सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments