Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र विद्यार्थ्यांना अचूक...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावर मिळणार -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

 

मुंबई, दि. ९ : राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली.

मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते. बैठकीत सर्व जिल्ह्यातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्राचा आढावा घेण्यात आला.

मंत्री पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन सहजपणे त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये, त्यांना प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, या हेतूने ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या सेवा १० जून पासून सुरु होणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थी सहाय्यता केंद्रचा उद्देशः

● जिल्हयातील शैक्षणिक संस्था, कक्षाच्या अधिनस्त कार्यरत असलेलेल परीक्षा केंद्र व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा यांच्यात समन्वय व संवाद साधणे.

● विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील विषय आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संबंधित आवश्यक ती सर्व तांत्रिक व इतर माहिती देणे.

● विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, तक्रारीचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे.

● विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, पात्रता व क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम, पदवी व शैक्षणिक संस्थांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करणे.

● CET परीक्षा व CAP फेऱ्यांशी संबंधित अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा पद्धत, वेळापत्रक आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.

● विविध शिष्यवृत्ती योजना, त्यासाठी पात्रता निकष इत्यांदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दणे.

● केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर, प्रवेश निश्चितीबाबतचे शंकांचे निराकरण करणे.

● करिअर मार्गदर्शन व अंदाजात्मक समुपदेशन (Predictive Counselling) प्रदान करणे.

● CAP, CET पोर्टल व परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना फ्रंट डेस्कवर प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून देणे.

● विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशन इंटर्नशिप व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे.

● अर्ज भरणे, अर्ज शुल्क भरणा करणे, कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशपत्र (Hall Ticket) संबंधित अडचणी तसेच CAP / CET फॉर्म मार्गदर्शन यासाठी सहाय्य करणे.

● तांत्रिक व शुल्कासंबंधीत तक्रारी / शंका (पेमेंट गेटवे समस्या, कागदपत्रे / छायाचित्र /स्वाक्षरी अद्ययावत करणे, दस्तऐवजीकरणातील त्रुटी इ.) आदींचे निराकरण करणे.

अशा प्रकारे या केंद्राच्या सेवा दिनांक 10 जून 2026 पासून सुरू होणार

आहेत.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments